[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोहे या पदार्थाला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते कृष्णाचं म्हणे रुक्मिणीशी सारखं भांडण व्हायचं नाही का? दरवेळी ती आपलं महत्त्व त्याच्या तोंडून वदवून घेण्याचा प्रयत्न करायची आणि कृष्ण तिला न थकता उत्तरं द्यायचा. एकदा तिनं ती त्याला किती आवडते, असं विचारलं तेव्हा कृष्णानं मिठाएवढी आवडतेस, असं उत्तर दिलं म्हणे. कुठल्याही कारणावरून भडकण्याचा आणि अबोला धरण्याचा बायकांना जन्मसिद्ध अधिकार असल्यामुळे, ती त्याच्यावर भडकली. मग त्यानं मिठाचं जेवणात महत्त्व किती, हे तिला पटवून दिलं, तेव्हा तिचा रुसवा निघाला, असं म्हणतात. खरं खोटं श्रीकृष्ण-रुक्मिणी जाणोत. आपल्या आयुष्यात पोह्यांचंही असंच आहे. असून अडचण नाही, पण नसून खोळंबा. कुणी पाहुणे अचानक टपकले, तर घरच्या स्वामिनीला पोहे हा पदार्थ म्हणजे ऐनवेळी मदतीला धावून येणाऱ्या त्या भगवान श्रीकृष्णासारखाच वाटत असणार. कधीही कुठलाही प्रसंग असो, पोहे या पदार्थाचा उल्लेख झाला नाही, असं कधी होत नाही. आयत्यावेळी झटपट तयार होणारा पदार्थ म्हणून, कुठल्याही दुसऱ्या घटकाशी चटकन जमवून घेणारा पदार्थ म्हणून पोह्यांची लोकप्रियता वाढली असावी. त्यांचं कांद्याशी जेवढं सख्य, तेवढंच बटाट्याशी. तेलावर जेवढं प्रेम, तेवढीच माया दुधावर. दह्याशीसुद्धा काही त्यांचं वाकडं नाही. मांजर कसं कुठूनही पडलं तरी चार पायांवरच उभं राहतं ना, तसंच पोहेसुद्धा अगदी दुधापासून आमटीपर्यंत कुठल्याही पदार्थात घातले, तरी चविष्टच लागतात. तर, अशी अगाध कीर्ती आणि अपार गुणवत्ता असलेल्या पोह्यांपासून तयार होणारा एक वेगळा पदार्थ आज बघूया. पोह्यांचा ढोकळा. डाळीच्या पिठाच्या ढोकळ्याशी काही भांडण झालं असेल, तर हा नवा प्रकार करून बघा.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • अर्धी वाटी पोहे
  • अर्धी वाटी रवा
  • एक वाटी घट्ट मलईचे दही
  • हिरव्या मिरचीचा ठेचा
  • चवीनुसार मीठ
  • अर्धा छोटा चमचा फ्रूट सॉल्ट
  • तेल
  • बारीक मूठभर चिरलेली कोथिंबीर
  • फोडणीचे साहित्य : एक टेबलस्पून तेल, अर्धा चमचा मोहरी, एक छोटा चमचा हळद, चिमूटभर हिंग, एक छोटा चमचा जिरे, ८-१० कढीपत्त्याची पाने

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • एका खोलगट आकाराच्या बाऊलमध्ये दही व एक कप पाणी एकत्र घेऊन चांगले मिक्स करा.
  • मग त्यात रवा व पोहे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा,चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.
  • हे मिश्रण एकजीव होण्यासाठी १०-१५ मिनिटे मुरण्यासाठी एका बाजूला ठेवा.
  • या पिठाचा ढोकळा उकडायला लावण्यापूर्वी त्यात फ्रूट सॉल्ट व दोन टेबलस्पून पाणी घाला व पिठातून बुडबुडे येऊ लागले की ढवळून घेऊन गोल पसरट भांड्याला आतून सगळीकडून तेलाचा हात लावून घेऊन त्या भांड्यात हे पीठ ओता.
  • मग ते भांडे इडलीपात्रात ठेवा व १०-१५ मिनिटांनी ढोकळा तयार झाल्याची खात्री करून घेऊन इडलीपात्रातून बाहेर काढा व एका बाजूला ठेवा.
  • दुसरीकडे गॅसवर एका कढल्यात फोडणीसाठी तेल गरम करून घ्या व तेल चांगले गरम झाले की त्यात मोहरी टाकून ती चांगले तडतडली की हिंग घालून मध्यम आचेवर एक मिनिट फोडणी परतून घ्या आणि नंतर ती फोडणी पॅनमध्ये तयार झालेल्या ढोकळ्यावर ओता.
  • मस्त वड्या कापून कोथिंबिरीने सजावट करून सर्व्ह करा.

[/one_third]

[/row]