[content_full]
मासे खायला आवडत असले, तरी माशांपासून बनणारा आवडता पदार्थ करणं, ही एक साधना आहे. गाणं ऐकायला सगळ्यांनाच आवडतं, पण गाता येतं, असं नाही. आलं, तरी ते दुसऱ्याला ऐकवण्याइतपत येणं अवघड असतं. चारचौघांत गाणं आणि त्यांना त्यावर माना डोयवायला लावून त्यांची दाद मिळवणं, यासाठी अनेक वर्षांची मेहनत लागते. स्वयंपाकाचंही तसंच आहे. उत्तम स्वयंपाक येणं, ही एक कला आहे. स्वयंपाक करण्यासाठी मुळात त्या सगळ्या प्रक्रियेवर आपलं मनापासून प्रेम असावं लागतं. या साधनेची सुरुवात होते, ती त्यासाठीचा कच्चा माल, म्हणजे त्यातले घटक पदार्थ निवडण्यापासून. इमारतीच्या पायाभरणीप्रमाणेज इथेच मुळात खूप मेहनत घ्यावी लागते, मनापासून काम करावं लागतं. आता पापलेटचंच उदाहरण घ्या ना! पापलेट बाजारात सहज मिळत असले, तरी कुठल्याही बाजारातून कुठल्याही प्रकारचे पापलेट घेण्यात मजा नसते. योग्य जागी आणि योग्य आकाराचे, योग्य दर्जाचे पापलेट मिळण्यासाठी एक पारखी नजर लागते. उत्तम पापलेट योग्य भावात मिळवण्यासाठी मासे विकणाऱ्या मामीशी घासाघीस करण्यासाठीही अनेक महिन्यांचं प्रशिक्षण आणि गाढा अनुभव कामी येतो, असं काही तज्ज्ञ सांगतात. काही जणांनी तर याचे मोफत प्रशिक्षण वर्गही उघडलेले असतात. तर असा का हा उत्तम दर्जाचा पापलेट रास्त भावात आपल्या पिशवीत पडला, की आपण अर्धी लढाई जिंकलेली असते. घरी येऊन त्याचं काय करायचं हा प्रश्न नसतो, कारण त्यासाठी अनेक पर्याय असतात. तरीही, `काय नेहमी तेच तेच करतेस,` हा शेरा टाळायचा असेल, तर यावेळी कोकणी पद्धतीची पापलेटची आमटी हा प्रकार करून बघायला हरकत नाही!
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- दोन पापलेट
- दहा ब्याडगी मिरच्या
- पाच लसूण पाकळ्या
- तीन-चार आमसूल
- एक चमचा धने
- छोटा कांदा
- पाव चमचा हळद
- खोबरे
- मीठ
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- पापलेटचे तुकडे कापल्यावर त्याला धुवून मीठ व हळद लावा.
- भिजवलेले धने व मिरची वाटून घ्या.
- नंतर या वाटणात हळद, लसूण घालून पुन्हा मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
- मग त्यात किसलेले बारीक खोबरे, उभा चिरलेला कांदा वाटून घ्या.
- तेलात तयार केलेले वाटण परतवा. नंतर थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या.
- त्यात पापलेटचे तुकडे हळूवार सोडा. थोडे मीठ घालून ८-१० मिनिट शिजवा.
- नंतर चिरलेली कोथिंबीर व आमसूल घातल्यास चव अधिकच वाढते.
[/one_third]
[/row]