शेपूची भाजी कोणाला आवडते तर कोणाला नाही. पण, शेपूची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. शेपू व्हिटॅमिन सी, ए, लोह, कॅल्शियम आणि मॅंगनीजने समृद्ध असते. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. आपण जास्त करून शेपूची भाजी खाण्यावर भर देतो. त्यामुळे सतत शेपूची भाजी खाऊन कंटाळा येतो. तर आज आपण थोड्या वेगळ्या प्रकारे म्हणजे ‘शेपूची पातळ भाजी’ कशी बनवायची याची सोपी रेसिपी पाहणार आहोत.
साहित्य :
- शेपूच्या २ जुड्या
- २ कांदे
- २ टोमॅटो
- आलं
- ६ ते ७ लसूण पाकळ्या
- हिरवी मिरची
- एक चमचा धने पूड
- १/२ चमचा जीरे पूड
- १/४ चमचा मिरेपूड
- १/४ चमचा हळद
- १/२ चमचा मसाला
- २ चमचे दही
- खडे मसाले (२ लवंग, दालचिनीचा तुकडा)
- १/२ वाटी भिजवलेली मूग डाळ
- फोडणीसाठी तेल किंवा तूप
- चवीनुसार मीठ
- पाणी
हेही वाचा…दहा मिनिटांत झटपट करा हेल्दी नाश्ता; रवा अन् पालकाचा पौष्टिक उत्तप्पा, नोट करा रेसिपी
कृती :
- प्रथम शेपूच्या दोन्ही जुड्या स्वच्छ धुऊन घ्या.
- त्यानंतर एका पातेल्यात पाणी उकळून घ्यावे व गॅस बंद करून त्यात शेपू टाकावी व २-३ मिनिटे ती त्यात तशीच ठेवून द्या.
- नंतर एका दुसऱ्या भांड्यात बर्फाचे पाणी घेऊन त्यात उकळत्या पाण्यातील शेपू टाकावी.(बर्फाच्या पाण्यात टाकल्यामुळे शेपूचा रंग बदलणार नाही)
- टोमॅटो, कांदा, लसूण, आलं, मिरची हे सर्व मिक्सरवर वाटून त्याची पेस्ट करून घ्यावी.
- तसेच शेपूही मिक्सरला वाटून त्याची प्युरी करून घ्यावी.
- नंतर गॅस सुरु करा व त्यावर एक पॅन ठेवा. पॅन थोडा गरम झाला की, त्यात २ चमचे तूप घालून घ्यावे. नंतर त्यात २ लवंग दालचिनीचे तुकडे, धने पूड, जिरेपूड, मिरपूड, हळद, मसाला घालून फोडणी द्या.
- त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो,कांद्याची प्युरी घालावी.
- नंतर त्यात १/२ वाटी भिजवलेली मूग डाळ घालावी व एक वाफ काढून घ्यावी
- त्यानंतर त्यामध्ये २ चमचे दही घालावे व मिक्स करून घ्यावे
- त्यानंतर त्यामध्ये शेपूची वाटून घेतलेली प्युरी घालावी.
- आवश्यकतेनुसार पाणी घालून चवीनुसार मीठ घालावे व शेपूची पातळ भाजी ५-१० मिनिटे शिजू द्यावी.
- ५-१० मिनिटे शिजल्यावर आपली ‘शेपूची पातळ भाजी’ तयार.