[content_full]
दिवाळीच्या मंगल आगमनाचे वेध सध्या सगळ्यांना लागले आहेत. घरोघरी फराळाच्या पदार्थांचे मंगल सुवास दरवळू लागले आहेत. परीक्षांची लगबग आणि टेन्शन अखेरच्या टप्प्यात येऊन, सोसायट्यांमध्ये मुलांचा आवाज वाढू लागला आहे. किल्ल्यांची लगबग दिसू लागली आहे. आवडत्या वस्तूंच्या, कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारातली गर्दी वाढू लागली आहे. बोनस येईल, तेव्हा तो ठेवायला जागा असावी, केवळ एवढ्याच सद्हेतूने घरोघरच्या गृहिणी आत्तापासूनच पतिराजांचे खिसे रिकामे करू लागल्या आहेत. धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत कुठल्या दिवशी कुठली साडी नेसायची, जाऊबाई, वन्संनी गेल्यावेळी आपल्यापेक्षा भारी साडी नेसली होती, त्यांच्यावर या वेळी कशी मात करायची, याचं प्लॅनिंग होऊ लागलं आहे. त्या निमित्तानं कपाटं उघडली जाऊन, `जळली, एक धड साडी नाही नेसायला,` असं म्हणत साड्यांची चळत बाहेर काढली जाऊ लागली आहे. सुट्टीत कुठे फिरायला जायचं, याचे बेत रंगू लागले आहेत. तर सांगायचा मुद्दा काय, की नेहमीसारखीच आनंदाची, उत्साहाची, भरभराटीची दिवाळी उंबरठ्यावर येऊन दाखल झाली आहे. दिवाळीत घरोघरी तयार होणाऱ्या फराळाच्या इतर पदार्थांबरोबरच एक आवडीचा पदार्थ असतो, तो वेगवेगळ्या प्रकारची शेव. मला तर फरसाण म्हणजेसुद्धा स्वतंत्रपणे एक फराळच वाटतो. पापडी, गाठी, दोन ती प्रकारची डाळ, चिवडा, असं सगळं मिश्रण सुरेखपणे त्यात गुंफलेलं असतं. याच फरसाणातला एक प्रकार म्हणजे बिकानेरी शेव, अर्थात थोडी जाडी शेव. ही शेव काही जणांच्या घरी आवर्जून केली जाते किंवा बाहेरून आणली जाते. फरसाणात किंवा नुसती खायलाही ही शेव चविष्ट लागतेच, पण तिची एक छान मसालेदार भाजीसुद्धा बनते. यावेळी हा शेवभाजीचा प्रयोग करून बघूया.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- दोन वाट्या बिकानेरी शेव
- दोन बारीक चिरलेले टोमॅटो
- ३-४ टेबलस्पून तेल
- एक छोटा चमचा मोहरी
- एक छोटा चमचा हळद
- एक छोटा चमचा लाल मिरचीचे तिखट
- चिमूटभर हिंग
- चवीनुसार मीठ.
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- टोमॅटोच्या फोडी करून ठेवा.
- गॅसवर जाड बुडाच्या पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करत ठेवा. तेल चांगले गरम झाले की त्यात मोहरी व हिंग घाला. मोहरी छान तडतडली की त्यात टोमॅटोच्या चिरून ठेवलेल्या फोडी घालून एक-दोन मिनिटे परतून घ्या.
- मग त्यात लाल मिरचीचे तिखट, हळद व मीठ घाला. टोमॅटो शिजवून घेऊन मग त्यात दोन कप पाणी घालून ढवळून घ्या व पाण्याला उकळी येऊ द्या.
- चांगले मिक्स झाले की त्यात शेव घालून लगेच सर्व्ह करा.
- ताटात वाढतांना बाऊलमध्ये शेव घालून त्यावर रस वाढू शकता.
- कोथिंबिरीची सजावट आणखी छान दिसते. ही भाजी पोळी, भाकरीबरोबर खाता येते आणि नुसतीही छान लागते.
[/one_third]
[/row]