[content_full]

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

…तरीही विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. आत्ता उठतो, सांगून तो गादीत पुन्हा लुडकला आणि पाच मिनिटांची ५० मिनिटं कधी झाली, त्याचा त्यालाच पत्ता लागला नाही. तरीही मोठ्या धीरानं तो उठला. पुन्हा गॅसपाशी गेला. त्याने किचन ट्रॉलीमधून कढई काढली. गॅसवर ठेवली. त्याची नाश्त्याची वेळ झाली होती, पण काहीच तयार नव्हतं. `तू जा जिमला, मला सुट्टी आहे ना, मी बनवतो आज नाश्ता,` असं त्यानं बायकोला मोठ्या उत्साहानं सांगितलं होतं, पण आता प्रत्यक्ष रणसंग्रामाची वेळ आल्यावर त्याचं अवसान गळालं होतं. आळसाचा वेताळ त्याच्या मानगुटीवर बसला होता, पण त्याच्या गोष्टी ऐकत बसायला त्याला वेळ नव्हता. बायको यायच्या आत तिच्यावर इंप्रेशन पाडण्यासाठी काहीतरी करणं भागच होतं. नाहीतर तिच्याकडून काय काय ऐकून घ्यावं लागलं असतं, याची कल्पनासुद्धा करता येण्यासारखी नव्हती. त्यातून नेहमीच्या पोहे-उपम्याच्या पलीकडचं काहीतरी करायचं होतं. त्याला आयत्या वेळी काही सुचेना. काय करावं कळेना. वेताळानं त्याची अवस्था पाहिली आणि त्यालाही दया आली. वेताळ म्हणाला, “विक्रमा, तुझ्या या अनंत ध्येयासक्तीने मी प्रभावित झालो आहे, म्हणून मी तुला शेवयांच्या उपम्याची कृती सांगतो. ती नीट लिहून घे आणि सांगतो तसं कर. कृती समजूनही तू शेवयांचा उपमा केला नाहीस, तर बायको आल्यावर तुला एवढं काही सुनावेल, की त्या मारानं तुझ्या डोक्याची शंभर शकलं होऊन तुझ्याच पायाशी लोळण घेतील आणि बायको वैतागून पुन्हा तुलाच तो सगळा पसारा आवरायला लावेल.“ तर मंडळी, वेताळानं सांगितलेली शेवयांच्या उपम्याची ही पाककृती खास आपल्यासाठीही…!

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • बारीक शेवयांचा चुरा 2 वाटी
  • शेंगदाणे/ हरभराडाळ/ उडिदडाळ
  • आले किसून
  • सुकलेल्या लाल मिरच्या 4 ते 5
  • तेल
  • मोहरी
  • जिरे
  • चिमूटभर हिंग
  • कढीपत्ता
  • मीठ
  • कोथिंबिर

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • बेताचे पाणी उकळून घ्या. पाणी उकळेपर्यंत मंद आचेवर एका कढईत तेलावर शेवयांचा चुरा तांबूस, खरपूस होईपर्यंत भाजून घ्या.
  • भाजल्यावर शेवया बाजूला काढून ठेवा. त्याच कढईत परत तेल गरम करा. मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, लालमिरच्यांची फोडणी करा.
  • डाळ किंवा शेंगदाणे आवडीनुसार घाला. परतलेल्या शेवया, मीठ घालून सर्व एकजीव करा. उकळलेले पाणी घालून चांगले हलवून झाल्यावर झाकण ठेवा. वाफ येऊन  मोकळा शिजवा. गरमगरम असतांना खा. (आवडीनुसार कांदा घालावा. फोडणीत परतून घ्यावा.)

[/one_third]

[/row]

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make shevaya upma maharashtrian recipes