भारतातील प्रत्येक घरामध्ये गरजेपेक्षा जास्तीचं अन्न शिजवलं जातं. पैपाहुणा आल्यावर ते उपाशी राहू नये यासाठी अधिकचं जेवण बनवण्याची आपल्या देशामध्ये परंपरा आहे. त्याशिवाय काही वेळेस रात्री अचानक भूक लागल्यावर जास्तीची बनवलेली एखादी पोळी किंवा थोडासा भात खाल्याने छान झोप लागते. पण कधीकधी घरामध्ये बनवलेलं उरलेलं अन्न शिळं होतं. आपल्याकडे अन्नाला पूर्णब्रम्ह म्हटलं जातं, फेकून देण्यापेक्षा ते दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता म्हणून खाल्लं जातं.
महाराष्ट्राभर फोडणीचा भात हा पदार्थ सकाळच्या नाश्ताला खाल्ला जातो. पण हा फोडणीचा भात खाऊन सुद्धा कंटाळा येऊ शकतो. अशा वेळी तुम्ही शिळ्या भाताचे थेपले हा नवा पदार्थ बनवून खाऊ शकता. ऐकायला जरा वेगळं वाटत असलं तरी हा पदार्थ चवीला रुचकर आहे. हा यूनिक पदार्थ बनवण्याची सोपी रेसिपी आम्ही खास लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातील घेऊन आलो आहोत.
साहित्य:
- एक किंवा दीड वाटी ताजा/शिळा भात
- २ मोठे चमचे दही
- १ चमचा तिखट
- २ चमचे धणे-जिरेपूड
- १ चमचा आलं मिरच्याची पेस्ट
- पाव चमचा हळद
- पाव चमचा हिंग
- चवीनुसार मीठ
- एक वाटी कणिक
- अर्धी वाटी डाळीचे पीठ
- पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
- एक मोठा चमचा कडकडीत तेलाचे मोहन तेल
कृती:
- प्रथम भात मऊ मळून त्यात सर्व साहित्य मिसळावं आणि घटसर पीठ मळावं.
- या पिठाच्या फुलक्याप्रमाणे बेताचे गोळे करुन त्याचे बशीच्या आकाराएवढे थेपले लाटावे.
- प्रथम गरम तव्यावर नुसते शेकून नंतर तेल सोडून दोन्ही बाजूने भाजावे.
आणखी वाचा – भूक लागलीये? झटपट बनवा खुशखुशीत डाळ वडा; लगेच पाहा सोपी रेसिपी
तयार झालेले थेपले तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचअपबरोबर खाऊ शकता. तुम्ही हा नवा पदार्थ आमची रेसिपी वाचून बनवलात, तर तो कसा झाला हे आम्ही नक्की कळवा.