[content_full]
खाण्याचे वेगवेगळे पदार्थ ही जर शाळा मानली, तर भेळ हा त्यातला ऑफ पिरियड आहे. शाळेत प्रत्येकाच्या वेगळ्या तऱ्हा असतात. कुणाला गणित आवडत नाही, कुणाला इतिहासाचा तिटकारा असतो, तर कुणाला भूगोल म्हणजे संकट वाटतं. विज्ञान आणि नागरिकशास्त्र वगैरे गोष्टी मुलांना आवडतात, ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. भाषेच्या बाबतीत काही गोष्टी आवडणाऱ्या असल्या, तर त्या मुलांना कशा आवडणार नाहीत, याची काळजी त्या शिकवणारे काही शिक्षक घेत असतात. कवितेचा अर्थ समजून सांगण्याऐवजी त्याची घोकंपट्टी करून घेऊन त्यातला रस पार पिळून ती कविता धुवून वाळत घालण्यावरच त्यांचा भर असतो. म्हणूनच या कुठल्याही विषयांपेक्षा ऑफ पिरियड हा सगळ्यांच्याच मुलांच्या जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा विषय असतो. ऑफ पिरियड हा एक भन्नाट अनुभव असतो. आम्ही शाळेत असताना, सकाळी आल्याआल्या आज कुठले सर/मॅडम रजेवर आहेत, हे शिक्षकांच्या खोलीतल्या रजिस्टरमध्ये जाऊन बघणं, हा आमचा पहिला उद्योग असायचा. थोड्यावेळाने बघितलं, तर त्यांच्या तासाला आज कोण येणार आहे, हेही समजायचं. प्रत्येक शिक्षकांची ऑफ पिरियड साजरा करण्याची पद्धत वेगळी असायची. कुणी गाण्यांच्या भेंड्या घ्यायचे, कुणी गोष्ट सांगायचे, कुणी एखादी थरारक घटना ऐकवायचे, कुणी मुलांच्याच कलागुणांना वाव देणारी स्पर्धा किंवा खेळ घ्यायचे. कधीकधी ग्राउंडवरच मुलांना हुर्रर्र केलं जायचं. भेळ हा असाच खाण्यातला ऑफ पिरियड आहे. संध्याकाळच्या वेळी भूक लागली असली, घरात वेगळं काही नसलं, करायचा कंटाळा आला असला किंवा नेहमीचं खावंसं वाटत नसेल, तर भेळ हा बेस्ट ऑप्शन असतो. बरं, भेळ हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय असतो, ऑफ पिरियडसारखाच. भेळेत आपण कांदा, टोमॅटो, फरसाण, शेव, चुरमुरे किती आणि कुठल्या प्रमाणात टाकतो, त्यावर त्याची चव आणि मजा बदलते. चुरमुरे, फरसाण न वापरता फक्त कडधान्यांचीही धमाल, पौष्टिक भेळ करता येते. बघा करून!
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- १ वाटी मोड आलेले मूग किंवा मटकी
- १ लहान बटाटा
- १ वाटी बारीक चिरलेली काकडी
- १ मध्यम टोमॅटो बारीक चिरून
- १/४ वाटी कोथिंबीर बारीक चिरून
- १ लहान कांदा बारीक चिरून
- चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट
- खजूर-चिंचेची चटणी
- पुदीना चटणी
- बारीक शेव
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- बटाटा उकडून त्याच्या बारीक फोडी कराव्यात.
- एका भांड्यात कडधान्यं, बटाट्याच्या फोडी, कांदा, टोमॅटो, काकडी, तिखट, मीठ एकत्र करून घ्यावेत.
- वरून खजूर-चिंच चटणी आणि पुदीना चटणी घालावी.
- वरून बारीक शेव पसरून सर्व्ह करावे.
[/one_third]
[/row]