[content_full]

शनिवारची संध्याकाळ होती. ती घरात निवांत टीव्ही बघत असली होती. दार वाजल्याचा आवाज आला. तिनं वळून पाहिलं, तर लॅच उघडून तो आला होता. खरंतर शनिवारी हाफ डे असला, तरी घरी यायला त्याला नेहमी उशीर व्हायचा. आज मात्र तो अचानक लवकर घरी आला होता. तिच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का होता. फ्रेश होऊन आल्यावर त्यानं विचारलं, `डार्लिंग, आपण छान डिनरला जाऊया का कुठेतरी?` तिच्यासाठी हा आश्चर्याचा दुसरा धक्का होता. आज तिला आवरायला नेहमीसारखा वेळ लागला नाही. ५५ मिनिटांत ती तयार झाली आणि दोघं डिनरला गेले. त्यानं तिच्यासाठी खास कॅंडल लाइट डिनर अरेंज केलं होतं. हा तिच्यासाठी तिसरा धक्का होता. रेस्टॉरंट घरापासून फार लांब नव्हतंच. चांदणी रात्र होती. त्यानं तिला विचारलं, “डार्लिंग, छान गप्पा मारत, चालत जाऊया का?“ तिला आता अस्मान ठेंगणं झालं होतं. दोघं हातात हात घालून छान गप्पा मारत घरी आले. लग्नाआधीसुद्धा कधी एवढी रोमॅंटिक डेट अनुभवली नव्हती, असं तिला वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मित्राला सांगताना तो म्हणाला, “काल माझी जाम वाट लागली होती यार! कधी नव्हे ते लवकर घरी आलो आणि बघितलं, तर स्वयंपाकघरात बेसिनमध्ये भांड्यांचा ढीग. शनिवारी संध्याकाळी किचन माझ्याकडेच असतं, याची मला एकदम आठवण झाली. ती भांडी घासून मग स्वयंपाक करायचा मला जाम कंटाळा आला होता. म्हणून बायकोला नाइलाजानं डिनरला घेऊन जावं लागलं. नेमके त्या हॉटेलचे लाइट गेले होते, पण गिऱ्हाइकं हातची जाऊ नयेत, म्हणून मेणबत्त्या लावून अर्ध्या किमतीत सर्व्हिस द्यायला ते तयार होते. मग तिथेच जेवलो. येताना टॅक्सीला पैसे कशाला घालवायचे, म्हणून बायकोला चालत जाऊया म्हटलं, तर ती लगेच तयार झाली.“ पुढच्या शनिवारीही तो घरी आला, तेव्हा त्याला घरात गेल्या वेळेसारखंच वातावरण दिसलं. तिनं यावेळी मुद्दामच बेसिनमध्ये भांडी ठेवल्येत की काय, अशी शंका त्याला आली. यावेळी तो जास्त सावध होता. “डार्लिंग, आज बाहेर जायच्या ऐवजी घरीच काहीतरी मागवूया. मी एक खास डिश आर्डर करतो,“ असं सांगितल्यावर ती काही बोलली नाही. Steamed millet hotch-potch with Bengal gram and groundnuts. अशा आकर्षक नावाची ती डिश तिनं आवडीनं खाल्ली. `thanks a lot for an amazing dinner again!` ती खूपच खूश झाली होती. त्याच आनंदात राहिलेली सगळी भांडी मी घासते, हेही तिनं जाहीर करून टाकलं. तो शांतपणे तिला म्हणाला, `डार्लिंग, तू आत्ता जे खाल्लंस, ती बाजरीची खिचडी होती. कालच आईकडून शिकून घेतली आणि आज मीच घरी केली! तू दिवसभराची ठेवलेली भांडीही बेसिनमध्ये तशीच आहेत. बेस्ट आफ लक!` आणि एवढंच बोलून तो त्याचा फोन उचलून बेडरूमच्या दिशेने चालू लागला…

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • १ वाटी बाजरी
  • पाव वाटी हरभराडाळ
  • पाव वाटी शेंगदाणे
  • आलं लसूण पेस्ट
  • मीठ
  • दीड चमचा गोडा मसाला
  • तेल
  • मोहरी
  • हिंग
  • हळद
  • कोथिंबिर

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • प्रथम बाजरी दोन तास भिजत घालावी.
  • शेंगदाणे आणि डाळ भिजत घालावे.
  • दोन तासांनी बाजरीतले पाणी काढून, बाजरी, डाळ आणि शेंगदाणे यांच्यात थोडं पाणी घालून हे मिश्रण कूकरमध्ये शिजवून घ्यावे.
  • तेल गरम करून फोडणी करावी.
  • आलं लसूण पेस्ट घालून परतावे.
  • शिजलेली बाजरी, मीठ, तिखट मसाला घालून चांगले परतून एक वाफ येऊ द्यावी.

[/one_third]

[/row]