[content_full]
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
`मुर्गी क्या जाने, अंडे का क्या होगा, लाइफ मिलेगी, या तवे पे फ्राय होगा,` असं बाबा रणछोडदास सांगून गेलेच आहेत. अंड्यासारखीच कथा तांदळाचीही. मशागत, नांगरणी, पेरणी, लावणी, काढणी, झोडणी, पाखडणी करून हाताशी आलेल्या तांदळाच्या कणांना तरी काय कल्पना असते, की आपल्या ताटात पुढे काय वाढून ठेवलंय? म्हणजे, आपण शिजवून कुठल्या ताटात वाढले जाणार आहोत, दूध-तूप-दह्यापासून वरण, आमटी, कढी, पिठलं, रस्सा, कालवणाबरोबर भुरकले जाणार आहोत, की तसेच भिजवून मिक्सरमध्ये भरडले जाणार आहोत, की भिजवून, वाळवून आपलं पीठ केलं जाणार आहे, की शिजवून कांदा, लसूण, मसाला किंवा कधी नुसत्याच डाळीबरोबर कढई किंवा कूकरमध्ये सर्वांगाने भाजले जाऊन फोडणीचा भात, खिचडी, बिर्याणी किंवा पुलाव म्हणून मिरवले जाणार आहोत, याची त्या बिचाऱ्या तांदळाच्या दाण्याला काहीच कल्पना नसते. कुठल्यातरी मार्गानं कुणाच्यातरी पोटाची खळगी भरायची किंवा कुणाच्या तरी जिभेचे चोचले पुरवायचे, एवढंच त्याचं जीवनकार्य. वर `हॅ! काय तो रोज शिळा फोडणीचा भात खायचा? तुला चांगला नाश्ता करायला काय होतं?`, किंवा `ए आई, काय गं सारखी खिचडी करतेस? कंटाळा आलाय ती खाऊन!` किंवा, `ह्याला काय बिर्याणी म्हणतात? एकदा हैदराबादची बिर्याणी खाऊन बघ!` हे ऐकून घ्यायचं. ह्या अशा टोमण्यांचा त्या गृहिणीपेक्षा तांदळालाच जास्त त्रास होत असावा. म्हणून बिचारा कायमच असा सडसडीत, सडपातळ राहतो. जरा फुगलेला असला, की त्याची किंमत कमी होते. बरं, एवढे उपद्व्याप, एवढा त्रास, एवढी मरमर, एवढे चटके, एवढे टोमणे सहन केल्यानंतर वर ऐकून काय घ्यायचं, तर `छे, भात नको. भातानं पोट वाढतं!` जो भात पोट भरण्याचं निरपेक्ष कार्य करतो, त्यानंच पोट वाढतं? याच्यासारखा दुसरा विरोधाभास नाही. असो. आपण पोटापेक्षा जिभेचा जास्त विचार करणारे असल्यामुळे, सध्या तवा पुलावाची रेसिपी बघूया.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- भातासाठी
- २ टी स्पून बटर
- पाऊण वाटी बासमती तांदूळ
- दीड वाटी पाणी
- मीठ
- मसाल्यासाठी
- गाजर : पाव वाटी पातळ चिरलेले (१ इंच तुकडे)
- भोपळी मिरची: पाव वाटी पातळ उभी चिरलेली
(१ इंच तुकडे) - फ्लॉवरचे तुरे अर्धे शिजवलेले : पाव वाटी
- कांदा : पाव वाटी बारीक चिरून आणि पाव वाटी उभा चिरून
- टॉमेटो : अर्धी वाटी बारीक चिरून
- शिजवलेला बटाटा : पाव वाटी बारीक फोडी
- वाफवलेले मटार : पाव वाटी
- दीड टी स्पून लसूण पेस्ट
- १/२ टी स्पून जिरे
- दीड टी स्पून लाल तिखट
- २ टी स्पून बटर
- १ टी स्पून पावभाजी मसाला
- खडा मसाला : १ लहान तुकडा दालचिनी, २ लवंगा, १ तमाल पत्र, १ वेलची
- चिरलेली कोथिंबीर
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- बासमती तांदूळ धुवून १० मिनिटे निथळत ठेवा. नंतर १ टी स्पून बटर नॉनस्टिक भांड्यात गरम करा. त्यावर बासमती तांदूळ २ ते ३ मिनिटे परता. नंतर तांदळाच्या दुप्पट पाणी घाला. थोडे मीठ घाला. मध्यम आचेवर भात शिजवा. अधूनमधून ढवळा.
- भात शिजला, की एका ताटात किंवा परातीत तो मोकळा करा. राहिलेले बटर शिजलेल्या भाताला लावून घ्या.
- नॉनस्टिक तवा मध्यम आचेवर गरम करा. त्यात २ टी स्पून बटर घाला. लगेच जिरे घाला. जिरे तडतडले की लसूण पेस्ट आणि लाल तिखट घालून परता. बारीक चिरलेला कांदा घालून थोडे परता. कांदा थोडा शिजला, की भोपळी मिरची आणि गाजर घाला. भाज्या अर्धवट शिजेपर्यंत परतून घ्या.
- नंतर फ्लॉवरचे तुरे, टॉमेटो घालून परता.
- नंतर मटार, बटाटा आणि पावभाजी मसाला घाला. चवीनुसार मीठ घाला.
- ही भाजी तयार झाली, की बाजूला काढून ठेवा. याच तव्यावर १/२ टी स्पून बटर घाला आणि त्यात खडा मसाला घाला. थोडे परतून घ्या आणि बाजूला ठेवलेली भाजी त्यात मिक्स करा. या भाजीत तयार भात घालून नीट मिक्स करा आणि परता. भाजी सगळीकडे लागली पाहिजे. हा तवा पुलाव रायत्याबरोबर गरम गरम सर्व्ह करा.
[/one_third]
[/row]