[content_full]
मस्त धुकाळ, गारठलेलं वातावरण आहे. रविवारची छान सुट्टी आहे. आज अचानक कुठलंही काम येऊन अंगावर कोसळलेलं नाही. बायकोनं तिच्याबरोबर साडी किंवा ड्रेसच्या खरेदीला येण्याची गळ घातलेली नाही. उलट ती अनेक वर्षांनी अचानक भेटलेल्या एखाद्या मैत्रिणीशी चॅट करत बसली आहे. तिची आई एवढ्या लवकर येण्याची काही लक्षणं नाहीत, किंवा आज वेळ आहे तर आईकडे जाऊन येऊ, असंही तिने सुचवलेलं नाहीये. अशा वेळी एखाद्या मित्राचा फोन येतो आणि संध्याकाळी एखाद्या स्पेशल कार्यक्रमाचा बेत ठरतो. बाहेर नेहमी गर्दी असते, म्हणून मग घरीच बसू, असाही विषय निघतो. बायकोचा चांगला मूड बघून तिला याचवेळी त्याबद्दल विचारावं, असं तुमच्या मनात येतं, तरीही तिची प्रतिक्रिया काय असेल, याची धाकधूक तुमच्या मनात असतेच. गेल्यावेळी फक्त असं विचारण्यावरून तिनं केलेलं अकांडतांडव तुमच्या लक्षात असतं. तरीही, यावेळची परिस्थिती वेगळी आहे, हे तुमच्या चाणाक्ष नजरेनं हेरलेलं असतं आणि आता वेळ घालवून चालणार नसतं. तुम्ही ही संधी साधता आणि पटकन, मोजक्या शब्दांत तिला विचारून मोकळे होता. मैत्रिणीशी गप्पांच्या नादात असलेली बायको चक्क त्यासाठी परवानगी देऊन मोकळी होते. वर स्वतः काहीतरी चमचमीत बनवून देण्याचंही कबूल करते. तुमचा आनंद गगनात मावत नाही. तुम्ही जवळच्या मित्रांना ही आनंदाची वार्ता कळवून टाकता आणि संध्याकाळचं निमंत्रणही देऊन टाकता. संध्याकाळी बाजारात जाऊन बांगडा घेऊन यावा आणि त्याचा एखादा चमचमीत पदार्थ करावा, असं तुमच्या मनात येतं. एवढा सगळा योग जुळून आलेला असताना, सगळे ग्रह आपल्याला अनुकूल असताना घरी बांगडा मसाला शिजला नसेल, तर त्यामागे एकच कारण असू शकतं – तुमच्या खिशात सुटटे पैसे नाहीयेत. तेव्हा ई वॉलेट वापरा, उधार-उसनवाऱ्या करा, बँकेत वशिले लावा, प्लॅस्टिक मनी वापरा, काहीही करा, पण अशा प्रसंगी खास हळदीतला बांगडा मसाला चाखण्याची संधी सोडू नका! त्याआधी ही रेसिपी शिकून घ्या.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- ४ बांगडे
- १ वाटी खोवलेला नारळ
- १ मोठा कांदा
- ५-६ लाल मिरच्या
- कोथिंबीर
- थोडी चिंच किंवा कोकम आगळ
- मीठ
- २ मोठे चमचे तेल
- अर्धा चमचा मेथी दाणे
- हळदीची ताजी पानं.
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- बांगडे कापून त्याचे लहान लहान तुकडे करा.
- स्वच्छ धुवून घ्या आणि थोडं मीठ लावून बाजूला ठेवा.
- खवलेला नारळ, मिरच्या, चिंच यांचा जाडसर मसाला वाटून घ्या.
- कांदा उभा पातळ चिरून घ्या.
- कढईत तेल तापवून त्यात मेथी फोडणीला घाला.
- नंतर कांदा घालून गुलाबीसर परतवून घ्या.
- त्यात वाटलेला मसाला, थोडं मीठ घालून मिश्रण परतवून घ्या.
- धुतलेल्या हळदीच्या पानात मीठ लावलेले बांगड्याचे तुकडे छान लपेटून घ्या आणि या मिश्रणात सोडा.
- थोडसं पाणी टाकून बांगडा शिजवा.
- सर्व्ह करण्यापूर्वी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
- गरम गरम भाकरी किंवा पोळीबरोबर फर्मास लागतो.
[/one_third]
[/row]