शुभा प्रभू-साटम
कांचीपुरम इडली माहीत असेलच. ही उंडी त्यासारखीच पण न आंबवता केलेली आणि झटपट होणारी.
साहित्य
इडली रवा एक वाटी, ओलं खोबरं पाव वाटी, फोडणीचे साहित्य -मोहरी, सुक्या मिरच्या, उडीद डाळ, मेथी दाणे, कढीपत्ता, हिंग, मीठ, तेल / तूप.
कृती
पारंपरिक उंडी तांदूळ भिजवून वाटून होते. पण त्याऐवजी इडली रवा चालू शकतो. सोयीचा पडतो. रव्याच्या दुप्पट पाणी उकळत ठेवा. कढईत आवडत असल्यास खोबरेल तेल अथवा तूप गरम करून फोडणीच्या साहित्याने फोडणी सिद्ध करा. त्यात इडली रवा घालून मंद आगीवर परता. त्यात ओलं खोबरं आणि उकळते पाणी ओतून ढवळा. गुठळ्या होता कामा नयेत. मीठ घाला आणि परतत राहा. उपमा करतो तसे. मिश्रण उपम्या इतपत घट्ट झाले की आचेवरून उतरवून गार करा. हाताने गोळे करता आले पाहिजेत. असे गोळे करून चाळणीत पंचा अथवा केळीचे पान ठेवून इडलीसारखे उकडून घ्या. पाच ते सात मिनिटे पुरे. पारंपरिक उंडी मध्यभागी खोलगट असते. तुम्ही तुम्हाला हवा तो आकार देऊ शकता. आवडत असल्यास यात काजूही घालता येतात.
ही उंडी काकवी अथवा नारळाच्या चटणीसोबत दिली जाते. उकडलेली आणि न आंबवता केल्यामुळे पचायला हलकी असते.