गुढीपाडव्याला घरात दरवर्षी गोडाधोडाचे पदार्थ बनवून मराठी माणसं नववर्षाचं अगदी जल्लोषात स्वागत करतात. यावर्षी गुढीपाडव्याला काय नवीन गोडाधोडाचं करायचं असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलो आहोत. रोज त्याच पद्धतीने बनवलेले वरण खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा झटपट आंबट गोड वरण. चला तर मग जाणून घेऊया कसं बनवायचं हे आंबट-गोड वरण.
आंबट-गोड वरण साहीत्य –
१ वाटी तुरीची डाळ, १ छोटा कांदा, ३-४ मिरच्या, १ टोमॅटो, १ वांगे, पाव चमचा हळद, सव्वा चमचा मीठ सुपारीएवढी चिंच, लिंबाएवढा गूळ, १ चमचा ओले खोबरे, कोथिंबीर, अडीच चमचा तूप. फोडणीसाठी – प्रत्येकी पाव चमचा मोहरी, जिरे आणि हिंग, कढीपत्याची ५-६ पाने.
आंबट-गोड वरण कृती –
आकांदा, टोमॅटो, वांगे वारीक चिरुन घ्यावे. मिरच्यांचे लांब तुकडे करावेत. तुरीची डाळ धुवून त्यात ३ वाट्या पाणी घालावे. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, वांगे, मिरच्या घालाव्यात. त्यात हळद घालून डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी. नंतर पातेल्यात तेल तापल्यावर त्यात फोडणीचे मसाले घालावेत. फोडणी तडतडल्यावर मंद गॅस करुन १ पळी डाळ घालून लगेचच पातेल्यावर झाकण ठेवावे म्हणजे फोडणीचा वास जाणार नाही. नंतर उरलेली सगळी डाळ त्यात ओतावी व १-२ वाट्या पाणी ओतावे. मीठ, गूळ, चिंच, खोबरे, कोथिंबीर घालून वरण चांगले उकळावे.
हेही वाचा – सनस्क्रीन विसरून जाल! उन्हाळ्यात टोमॅटोचे ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा
ही रेसिपी या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा आणि कशी होते हे आम्हाला नक्की कळवा.