[content_full]
मेथी ही जशी `ढ` भाजी मानली जाते ना, तसा कोबी हा अतिशय हुशार विद्यार्थी मानला जातो. म्हणजे, निदान खानावळीत तरी. `कमी तिथे आम्ही,` अशी कोबीची कामाची पद्धत असते. खानावळीच्या बाबतीत सांगायचं, तर कोबी असला तर काही कमीच पडत नाही, अशी परिस्थिती असते. बाजारात कुठेही मिळणारी, कुठल्याही वेळी उपलब्ध असणारी, अशी ही घसघशीत, वजनदार भाजी आहे. कोबीचं रूपच देखणं आहे. हिरवागार कोबी अंगापिंडानं काही फारसा आकर्षक वगैरे नाही. गोलमटोल आणि गलेलठ्ठ गोळाच दिसतो, पण त्याची रचना फार चित्तवेधक असते. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत एखाद्या चिमुरडीनं आजीच्या नऊवारीच्या लड्या अंगाभोवती लपेटून घ्याव्यात ना, तसं काहीतरी कोबीकडे पाहिल्यावर वाटतं. कोबीच्या अंगावरचा पानांचा गुंता जरा जास्त सुटसुटीत असतो, एवढंच. आरोग्याला हितकारक भाज्यांच्या यादीत कोबीचं स्थान फारचं वरचं नसलं, तरी महिन्याच्या खर्चाला उपकारक म्हणून त्याला नक्कीच उच्च स्थान मिळतं. खानावळमालकांची तर कोबीशी घट्ट मैत्री असते. कोबी चिरायला सोपा, शिजवायला सोपा, एवढेच त्याचे गुणधर्म ढीगभर भाजी करण्यासाठी उपयोगी ठरतात. बाकीच्या भाज्या सोलणं, निवडणं, मोडणं, अशा कृतींमध्ये जो वेळ जातो, तो कोबी वाचवतो. इतर भाज्यांच्या तुलनेत खर्च कमी आणि आकारमान जास्त, हे सुख तो देत असल्यामुळे आग्रह करकरून भाजी कुणालाही वाढता येते, किंबहुना भाजी कमी आहे, हे सांगण्याची वेळ येत नाही. घरात मात्र कोबीचं फार कौतुक नसतं. त्याला मेथीच्या एवढी अवहेलना सहन करावी लागत नाही, हेच काय ते त्याचं नशीब. हाच कोबी हॉटेलात मात्र स्वतःला व्हेज मंचुरियन वगैरे पदार्थांमध्ये सजवून घेऊन भरपूर मिरवून घेतो आणि हॉटेलमालकालाही त्याचे मजले वाढवण्यासाठी सक्रिय हातभार लावतो. आज याच व्हेज मंचुरियनची कृती बघूया.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- दीड वाटी कोबी, बारीक चिरलेला
- १/४ वाटी चिरलेला कांदा
- २/३ वाटी किसलेले गाजर
- १ चमचा कॉर्न फ्लोअर
- २ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
- २-१/२ चमचे मैदा
- २ मध्यम हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- मीठ
- मिरपूड
- तेल
- ग्रेव्हीचे साहित्य
- ७ ते ८ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
- ४ ते ५ मध्यम हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
- १/२ चमचा सोया सॉस
- १ चमचा टोमॅटो सॉस
- चवीनुसार चिली सॉस
- १/२ वाटी पाणी
- अर्धा इंच किसलेलं आलं
- १ वाटी पाण्यामध्ये १/२ चमचा कॉर्नफ्लोअर एकत्र करून
- १ चमचा तेल
- १ चिमूटभर साखर
- मीठ
- कोथिंबिर
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- कोबी, गाजर, कांदा, मैदा, कॉर्नफ्लोअर, लसूण, हिरव्या मिरच्या, मीठ आणि मिरपूड सर्व साहित्य एकत्र करावे.
- मिश्रणाचे लहान-लहान गोळे करावे. मिश्रणामध्ये असणाऱ्या भाज्यांना पाणी सुटते, त्यामुळे गोळे तयार करताना त्यामध्ये पाणी घालू नये.
- पॅनमध्ये तेल गरम करून गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे.
- ग्रेव्हीची कृती
- एका कढईत तेल गरम करून त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस घालावे. हे मिश्रण मोठ्या आचेवर शिजवून घ्यावे.
- मिश्रणात कॉर्नफ्लोअर घालावे. मिश्रण उकळू लागले कि त्यामध्ये साखर, मीठ आणि कोथिंबिर घालावी.
मिश्रणाला उकळी फुटली की मध्यम आचेवर २ मिनिटे शिजवून घ्यावे. - आता तयार केलेले मांचुरियन गोळे घालून मिश्रण २-३ मिनिटे शिजवावे. ( सर्व्ह करण्याच्या थोडा वेळ अगोदर गोळे घालावेत.)
एका डिश मध्ये तयार गरम बॉल्स घेऊन त्यावर गरम ग्रेव्ही घालावी.
[/one_third]
[/row]