Ragi Halwa Recipe : शरीराला अपायकारक असणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं की अनेक प्रकारच्या व्याधी आणि आजारांना सामोरं जावं लागतं. डायबिटीज झालेल्या रुग्णांना अनेक प्रकारचे पथ्य पाळावे लागतात. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढलं की डायबिटीज सारखा भयानक आजार डोकं वर काढू लागतो. पण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीय. एका जबरदस्त रेसिपीमुळं डायबिटीजवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. कारण नाचणीचा हलवा म्हणजेच रागी हलवा शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करु शकतं. त्यामुळे डायबिटीज रुग्णांना नाचणीच्या हलव्याचं सेवन करणं फायदेशीर ठरु शकतं. त्यामुळे नाचणीच्या हलव्याची खाली दिलेली सोपी आणि साधी रेसिपी तुम्ही एकदा पाहून घ्या.
साहित्य – नाचणीचे पीठ, गूळ, काजू, तूप थोडे जास्त
कृती – वाडग्यात पाऊण वाटी नाचणीचे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्या. गुठळी ठेऊ नये. हे मिश्रण नंतर मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्या. मिश्रण दुधाळ दिसायला हवे. मिश्रणाला नंतर स्वच्छ पंच्यामधून गाळून घ्या. पूर्ण अर्क पिळून काढा. वाटल्यास परत एकदा मिक्सरमधून वाटून परत अर्क काढा. जाड बुडाच्या भांड्याला पाऊण वाटी गूळ योग्य प्रमाणात पाण्यात घालून विरघळवून घ्या. पाक होऊ देऊ नये. मिश्रण गाळून घ्या. कढईत थोडे तूप तापवून काजू लालसर भाजून बाजूला काढून घ्या. याच कढईत रागीचा अर्क घालून मंदाग्नीवर शिजवा. मिश्रण शिजायला साधारणपणे दहा मिनिटे लागतात. मिश्रण साधारणपणे घट्ट व्हायला लागले की गुळाचे पाणी घाला.
सतत ढवळल्याने मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागेल तसे त्यात तूप सोडत राहा. मिश्रणाचा रंग गडद होऊ लागतो. सगळे तूप एकदम घालू नये. थोडे थोडे घालत राहा. मिश्रणाचा पोत साधारणपणे थलथलीत झाला किंवा मिश्रण भांड्याच्या कडेने सुटू लागले की समजा हलवा तयार झाला. आता यात काजू घालून परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्या. हे मिश्रण साधारण पारदर्शक दिसते. पारंपरिक पद्धतीत नाचणी भिजत घालून त्याचे दूध काढतात पण ती पद्धत फार किचकट असल्यामुळे ही सुटसुटीत पद्धत बरी पडते.