Shravan Special Recipe: श्रावण हा अनेक सण आणि व्रत-वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या दिवसांत विविध गोड पदार्थ आवर्जून बनवले जातात. त्यात हळदीच्या पानांच्या पातोळ्या, गव्हाचा हुंडा, गव्हाच्या लाह्या अशा अनेक पदार्थांचा समावेश असतो. त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे गूळ-खोबऱ्याच्या साटोऱ्या. आज आम्ही तुम्हाला हा पदार्थ कसा बनवायचा ते सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया गूळ-खोबऱ्याच्या साटोऱ्या बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती…
गूळ-खोबऱ्याच्या साटोऱ्या बनविण्यासाठीचे साहित्य: (Shravan Special)
- २ वाटी बारीक रवा
- २ वाटी तीळ
- १ वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस
- १ वाटी शेंगदाणे
- २ वाटी गूळ
- २ चमचे वेलची पूड
- तूप
गूळ-खोबऱ्याच्या साटोऱ्या बनविण्याची कृती:
हेही वाचा: श्रावणातल्या उपवासात आवर्जून बनवा मखान्याची पौष्टिक बर्फी; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
- सर्वांत आधी रव्यात गरम तूप घालून, ते पाण्याने मळून घ्यावे आणि काही वेळ झाकून ठेवावे.
- आता गॅसवर कढई ठेवून, त्यात तीळ मंद आचेवर भाजून घ्यावेत.
- त्यानंतर शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कीसदेखील भाजून घ्यावा.
- आता तीळ आणि शेंगदाण्याचे कूट एकत्र बारीक करून, गूळदेखील बारीक किसून घ्यावा.
- आता तीळ आणि शेंगदाण्याचे कूट, खोबऱ्याचा कीस व गूळ एकत्र करून, हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये एकत्र बारीक करून घ्यावे.
- आता बारीक केलेल्या मिश्रणात वेलची पूड घालावी.
- मग भिजवलेल्या रव्याचे बारीक गोळे करावेत आणि प्रत्येक गोळ्याची पारी करून, त्यात १ चमचा तीळ-खोबऱ्याचे मिश्रण घालावे.
- आता त्या पारी पुरीप्रमाणे लाटून घ्याव्यात.
- मग गरम तव्यावर तूप टाकून,साटोऱ्या भाजून घ्याव्या.