Kadvya Valache Birde Recipe In Marathi: बऱ्याच मराठी घरांमध्ये सोमवारी शांकाहार करण्यावर भर दिला जातो. अशा वेळी जेवणात कोणती भाजी बनवायची असा प्रश्न महिला वर्गाला पडलेला असतो. नेहमी पदार्थ खाऊन घरातले सगळेच कंटाळलेले असतात. तेव्हा काहीतरी चविष्ट आणि पौष्टिक बनण्याचा विचार करत असल्यास तुम्ही कडव्या वालाचे बिरडे हा पदार्थ बनवू शकता. बरेचसे लोक याला वालाची उसळ किंवा वालाची रस्साभाजी असेही म्हणतात. हा पदार्थ भात, चपाती/ पोळी आणि भाकरीबरोबर खाता येतो. काहीजणांकडे उपवासाला तयार केल्या जाणाऱ्या जेवणामध्ये वालाचे बिरडे हा पदार्थ प्रामुख्याने आढळतो. श्रावण महिन्यामध्ये हा पदार्थ खास करुन बनवला जातो. काही घरांमध्ये तर दर सोमवारी वालाचे बिरडे असते. झटपट तयार होणाऱ्या कडव्या वालाचे बिरडे या पदार्थाची सोपी रेसिपी आम्ही आज तुमच्यासाठी लोकसत्ता पूर्णब्रह्म अंकातून घेऊन आलो आहोत .
साहित्य:
- १ पेला मोड आणून सोललेले कडवे वाल
- २ चमचे बिरड्याचे वाटण
- अर्धी वाटी वाटलेले ओले खोबरे
- २-३ चमचे चिंचेचा कोळ किंवा ३-४ आमसूल
- अर्धा चमचा मोहरी
- पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
- २-३ मोठे चमचे तेल
- अर्धा चमचा हळद
- १ चमचा तिखट
- १ बारीक चिरलेला कांदा
- पाव चमचा हिंग
- चवीनुसार मीठ, गूळ
कृती:
- गरम तेलावर मोहरी आणि हिंगाची फोडणी करा.
- त्यावर कांदा टाकून तो गुलाबी झाल्यावर त्यावर हळग टाका.
- पुढे लगेच सोललेले वाल टाकून परतून घ्या.
- त्यानंतर बिरड्याचे वाटण टाकून चांगले परता.
- नंतर तिखट घालून त्यात वाल बुडतील इतके पाणी टाका.
- उकळी आल्यावर वर ताटलीत पाणी ठेवून वाल चांगले मऊ होईपर्यंत शिजवा.
- नंतर वाटलेले खोबरे, चिंचेचा कोळ, मीठ आणि गूळ घाला.
- थोडे पाणी घासून उकळी आणा व वरुन कोथिंबीर घाला.
आणखी वाचा – काहीतरी चटपटीत खायचंय? तर मग घरच्या घरी बनवा रुमाली वडी, वाचा संपूर्ण रेसिपी
(टीप: याचप्रमाणे मोड आणून साल काढलेल्या इतरही कडधान्यांचे बिरडे तयार करता येईल.)