Raw mango pickle recipe: लोणचे हा शब्द ऐकताच तोंडातून पाणी सुटते काहींना कितीही भाज्या असल्या तरी, तोंडी लावण्यासाठी लोणचं लागतेच. लोणचं अनेक प्रकारचे केले जातात. कैरी, गाजर, मिरची इत्यादी. पण या सगळ्यात अनेकांची पसंती कैरीच्या लोणच्याकडे वळते उन्हाळ्यात कैरीचे लोणचे अधिक प्रमाणात केले जाते. कारण यादरम्यान कैऱ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची लोणची खाल्ली असतील पण आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अस्सल खानदेशी पद्धतीचं लोणचं. चला तर मग पाहुयात याची सोपी अन् झटपट रेसिपी..
खानदेशी कैरीचे लोणचे साहित्य –
२ मोठ्या आकाराच्या कैऱ्या – वजन अंदाजे अर्धा किलो
४ चमचे मीठ
१ हिंगाचा खडा(लोणच्याच्या बाटलीला धूर देण्यासाठी)
२ चमचे गूळ पावडर
१ चमचा धणे पावडर
१ लाल तिखट मसाला
४-५ चमचे बेडेकर लोणचे मसाला
१ चमचा कुटलेली बडीशेप
१/४ चमचा हळद
खडे मसाले :
८-१० काळीमिरी,
१ इंच कुटलेली दालचिनी,
५-६ लवंगा
१/२ वाटी तेल
१/४ चमचा हिंग
१ चमचा मेथी दाणे
खानदेशी कैरीचे लोणचे कृती –
१. खानदेशी पद्धतीचे लोणचे बनवण्यासाठी २ मोठ्या कैऱ्या, किंचित पिकायला आलेल्या (त्यामुळे आंबट गोडसर नैसर्गिक चव लोणच्याला छान येते) अशा, स्वच्छ धुवून पुसून सुकवून घ्या. लोणच्याचे हवे असे तुकडे कापून स्वच्छ सुक्या रुमलावर वाळत ठेवा. पाण्याचा अंश निघून जायला हवा.
२. तव्यावर मीठ भाजून घ्यायचं, जेणेकरून मिठामधला पाण्याचा अंश निघून जाईल. मीठ लगेच सरसरीत दिसून येतं.
३. गॅस बंद करून त्याच तव्यावर हिंगाचा खडा ठेवायचा आणि त्यावर लोणच्याची (स्वच्छ धुवून कोरडी केलेली) बरणी पालथी घालायची. हिंगाच्या वासामुळे बरणी आतून कोरडी आणि निर्जंतुक होते.
४. बरणीच्या तळाला गूळ पावडरचा थर लावायचा.
५. मग त्यावर मीठ, धणे पावडर, लाल तिखट मसाला, बेडेकर लोणचे मसाला, कुटलेली बडीशेप हळद, खडे मसाले, ८-१० काळीमिरी, १ इंच कुटलेली दालचिनी, ५-६ लवंगा यांचा थर लावायचा.
६. एका कढईत तेल कडकडीत गरम करायचं. गॅस बंद करून त्यातलं एक चमचा तेल घेऊन मेथी दाणे टाकायचे, दाणे तडतडले की दाण्यासकट ते तेल बरणीतल्या मसाल्यावर ओतायचे. मग अजून एक चमचा तेल घेऊन त्यावर हिंग टाकायची. हिंग तडतडली की ते तेल मसाल्यावर ओतायचे.
७. मग कढईतील सर्व तेल बरणीत मसाल्यावर ओतून घ्यायचे. चमच्याने मिक्स करून थंड होऊ द्यायचे.
८. तेल थंड झाले की त्यात कैरीच्या फोडी टाकायच्या. सर्व एकत्र मिक्स करायचं.
हेही वाचा >> खानदेशी पद्धतीने करा ‘खानदेशी वांग्याचं भरीत पुरी’; भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा ही रेसिपी
९. सर्व फोडींना मसाला व्यवस्थित लागला की स्वच्छ कोरडा सुती कापडाने बरणीचे तोंड बांधून झाकण घट्ट लावून ठेवायचे. रोज एकदा असे आठवडाभर कोरड्या चमच्याने ढवळून घ्यायचे. आठवाड्याभरात कैऱ्या मसाल्यात छान मुरून लोणचं खायला तयार होतं. जेवढं जास्त मुरेल तेवढी लज्जत वाढत जाईल.
ही रेसिपी कूकपॅडवर सुप्रिया घुडे यांची आहे.