Diwali Special Kaju Katli Recipe: आजपासून म्हणजेच २८ ऑक्टोबरपासून दिवाळीची सुरूवात झाली आहे. आज सर्वत्र वसुबारस साजरी केली जातेय. दिवाळी म्हटलं की दिवे, रांगोळी, फराळ या गोष्टी डोळ्यांसमोर आपसूकच येतात. यात खव्वयेप्रेमींना प्रतिक्षा असते ती वेगवेगळे फराळ आणि मिठाईची. चकली, लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, अनारसे, शेव असे विविध फराळ अनेकांच्या घरी बनवले जातात.

दिवाळीत जशी फराळ खायला मजा येते तशीच मिठाई खाण्याची इच्छाही अनेकांना असते. आणि या मिठाईत सर्वांची आवडती मिठाई म्हणजे काजू कतली. काजू कतली अनेकदा तुम्ही विकत आणली असेल. पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी काजू कतली बनवायला शिकणार आहोत.

हेही वाचा… सुरसुरी, चकरी अन् बॉम्ब! दिवाळीत बनवा माव्यापासून चवदार मिठाई, ट्रेंडिंग रेसिपी लगेच ट्राय करा

साहित्य

  • २ कप काजू
  • 1 कप साखर
  • १/२ कप पाणी
  • 1 टीस्पून तूप
  • 1/4 टीस्पून वेलची पावडर

कृती

१. सर्वप्रथम, मिक्सरमध्ये २ कप काजू घ्या आणि त्याची बारीक पावडर करून घ्या. यात गुठळ्या नाहीत याची खात्री करून काजू पावडर चाळून घ्या आणि बाजूला ठेवा.

२. त्यानंतर एका मोठ्या कढईत १ कप साखर आणि ½ कप पाणी घ्या. ते नीट ढवळून घ्या आणि साखर विरघळवून घ्या. हे मिश्रण ५ मिनिटे उकळवा. त्यात काजूची तयार केलेली पावडर घालून मिक्स करा. मिश्रण चांगले एकत्र होईपर्यंत आणि त्याची पेस्ट तयार होईपर्यंत सतत ढवळत रहा. आता त्यात १ टीस्पून तूप आणि ¼ टीस्पून वेलची पावडर घाला आणि चांगले मिसळा.

३. या मिश्रणाची पेस्ट होईपर्यंत ते शिजवा. जास्त शिजू नका, कारण बर्फी कडक होईल.

४. आता बटर पेपरवर हे मिश्रण काढून घ्या. बटर पेपरवर तुप लावून घ्या. आता मिश्रण घट्ट पीठासारखे होईपर्यंत चमच्याच्या साहाय्याने त्याला थोडे मळून घ्या.

५. पीठ तयार झाले की मऊ पीठ तयार करण्यासाठी थोडेसे मळून घ्या. तयार झालेले हे पीठ बटर पेपरमध्ये ठेवा आणि त्याला लाटणीच्या मदतीने लाटून घ्या. एकसमान असल्याची खात्री करून थोडे जाड लाटून घ्या.

६. आता त्याला थोडं तूप लावाआणि त्यावर सिल्व्हर वर्क लावा. वर्क लावणे ऐच्छिक आहे. आता हिऱ्याच्या आकारात किंवा तुमच्या आवडीच्या आकारात कापून घ्या.

७. तुमची काजू कतली तयार आहे. आता या हवाबंद डब्यात ठेवल्यावर महिनाभर काजू कतलीचा आनंद घ्या.