कारलं म्हंटलं की लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येजण नाक मुरडतो. कारले चवीला कडू असल्याने बऱ्याच जणांना ते आवडत नाही. कारले चवीला जरी कडू असलं तरी आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर असत. कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट, फ्लेव्होनॉईड्स आणि इतर पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या अनेक आरोग्य समस्या सहज दूर होतात. ज्यांना फिट राहायचं आहे त्यांच्यासाठी तर कारल्याशिवाय कोणताही डाएट प्लॅन अपूर्णच ठरेल. कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच.. असं तुमच्याही रेसिपीत होतंय का? मग ही एक चटकदार रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर जाणून घेऊयात कसं बनवायचं हे कुरुकरीत कारलं.
कुरुकरीत कारलं साहित्य –
- अर्धा किलो कारली
- १ चमचा मीठ
- १ लिंबाचा रस
- १ चमचा लाल तिखट
- पाव चमचा हळद
- १ चमचा जिरे
- पाव वाटी रिफाईंड ऑईल
कुरकुरीत कारलं कृती –
अर्धा किलो कारल्याच्या पातळ पातळ चकत्या कराव्यात. या चकत्यांना मीठ, एक लिंबाचा रस चांगला चोळून घ्या आणि १ तास तसेच ठेवावे. एका तासानंतर त्या कारल्याच्या चकत्या पाण्यात तीन-चार वेळा चांगल्या धुवून घ्याव्यात. कढईत पाव वाटी तेल घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाकावे. त्यानंतर वरील कारल्याच्या चकत्या स्वच्छ धुवून व घट्ट पिळून चार-पाच मिनिटे तेलात चांगल्या परताव्या. त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट घालून कारले कुरुकुरीत होईपर्यंत परतावे.
हेही वाचा – उपवासाला काही वेगळं ट्राय करायचंय ? मग वरई आणि साबुदाण्यापासून बनवा हलका-फुलका डोसा
हे काप खाताना तुम्हाला कारल्याचा कडवटपणा अजिबात जाणवणार नाही.