कारली म्हटलं आपल्यापैकी बरेचसे लोक नाक मुरडतात. जर लोकांना तुमची नावडती भाजी कोणती असे विचारले, तर ते पटकन कारली असे उत्तर नक्की देतील. कारली चवीला कडू असली, तरी त्यामध्ये अनेक उपयुक्त गुणधर्म असतात. कारली खाल्याने शरीरामध्ये आवश्यक घटक पोहोचतात. म्हणून घरातील लहान मुलांना कारली खाऊ घालण्याकडे वडीलधाऱ्या माणसांचा कल असतो. असे असले तरी काही वयस्कर माणसांनाही ही भाजी नकोशी वाटत असते. कडू असणाऱ्या कारल्याची चविष्ठ भाजी तयार करता येते याबाबतची माहिती बऱ्याचजणांना ठाऊक नाही आहे. आणि म्हणूनच आम्ही कारल्याच्या भाजीची (चिंच गुळाच्या भाजीची) सोपी रेसिपी खास तुमच्यासाठी लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेऊन आलो आहोत.
साहित्य :
- १ कप कारल्याच्या चकत्या
- तेल, हिंग आणि मोहरीची फोडणी
- ३ हिरव्या चिरलेल्या मिरच्या
- हळद
- चिंचेचा कोळ
- गूळ
- ३ मोठे चमचे दाण्याचा कूट
- २ मोठे चमचे तिळाचा कूट
- ओले खोबरे
- तिखट, मीठ, काळा मसाला चवीनुसार
कृती :
- फोडणी तयार करुन मिरच्या, हळद घाला.
- कारल्याच्या चकत्या चांगल्या परता.
- गरम पाणी घालून कारले शिजवा.
- सर्व साहित्य घालून रस्साभाजी बनवा.
आणखी वाचा – फणसाच्या गऱ्याची चमचमीत भाजी शिकून घ्या; हात चिकट न करता अर्ध्या तासात बनवा रेसिपी
(टीप – कारली लहान, हिरवी/ पांढरी आणि आकाराने मोठी असावीत. पांढऱ्या म्हणजेच फिक्या रंगाची कारली भाजीसाठी चांगली असतात. भाजी करण्यापूर्वी कारली धुऊन, तासून त्यावर असलेला खडबडीत भाग काढून टाका. जाडसर चकत्या करुन मीठ लावून ठेवा व पिळून वापरा.)