दिवाळी हा सण देशभरात अगदी थाटामाटात साजरा होत असतो. या सणादरम्यान सर्व दुकानं, घरं दिव्यांच्या झगमगाटात न्हाऊन निघालेली असतात. दिवाळीत इतर गोष्टींसोबत गोड पदार्थ, मिठाई यांना भरपूर प्रमाणात मागणी असते. अशात राजस्थान हे आपल्या उत्तम खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असून, दिवाळीसारख्या सणांमध्ये राजस्थानी मिठाया विशेष भाव खाऊन जाताना आपल्याला दिसतात. पण, यांमध्ये काही मिठाया अशा आहेत की, ज्या आपण खराब न होऊ देता, महिनाभरासाठी टिकवून ठेवू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थानमधील मेवाड शहरात सणांच्या दिवशी, विशेषकरून दिवाळीसाठी बालुशाही आणि सुतरफेणी यांसारखे पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार होतात; जे महिनाभर खराब न होता टिकवता येऊ शकतात. उदयपूर शहरात दिवाळीनिमित्त तयार होणाऱ्या सुतरफेणीमध्ये सुंदर चवीसोबतच महिनाभर टिकून राहण्याची खासियत असल्याने तेथील लोकांमध्ये या मिठाईला विशेष पसंती आहे. उदयपूरच्या वातावरणाला योग्य असणारी सुतरफेणी ही तिथल्या स्थानिक लोकांची आवडती मिठाई तर आहेच; पण त्याचसोबत इतर जवळच्या राज्यांमध्ये आणि पर्यटकांमध्येदेखील तिची चांगलीच चर्चा असल्याचे समजते.

हेही वाचा : दिवाळीत गोड खाऊन, रक्तातील साखर वाढण्याचं आलंय टेन्शन? काळजी नको घरच्या घरी बनवा ही शुगर फ्री बर्फी!

उदयपूरमधील दिल्ली गेट परिसरात असणाऱ्या मिठाईच्या दुकानाचे मालक बाबू जैन यांनी “सुतरफेणी हा गोड पदार्थ पिढ्यान् पिढ्या दिवाळी किंवा इतर सण-समारंभांसाठी बनवला जातो,” असे न्यूज १८ ला त्यांच्या ‘विविध राज्यांत दिवाळीनिमित्त बनवल्या जाणाऱ्या मिठाया’, अशा एका व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीत सांगितले. त्यासोबतच हा पदार्थ पिठापासून बनत असून, दुधासोबत खायलादेखील तो सुंदर लागतो आणि तो साधारण २०० रुपये किलो अशा दराने विकला जातो, अशी आणखी माहिती दिली.

मग ही सगळ्यांची लाडकी सुतरफेणी कशी बनवली जाते ते पाहू.

साहित्य :

दोन कप फिलो पीठ [phyllo dough]
चार कप साखर
तूप
पिस्ता व बदाम
वेलची पावडर

कृती :

साखरेचा पाक बनवून, तो पाक काही तास थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या.
आता फिलो पीठ घेऊन, ते बारीक करून, त्याचे वेटोळे करीत, त्याचा एक गोलाकार आकार तयार करा.
एका पातेल्यात तेल घेऊन, ते कडकडीत तापवा आणि त्यामध्ये फिलो पिठाला गोलाकार आकार दिलेली सुतरफेणी तळून घ्या. ३० सेकंदांत ही सुतरफेणी तळून निघते.
शेवटी तळून बाहेर काढलेली सुतरफेणी तयार केलेल्या साखरेच्या पाकात घोळवून, त्यावरील अतिरिक्त पाक काढून टाका.
आता तयार सुतरफेणी वर पिस्ता, बदाम व वेलची पावडर घालून घ्या.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keep your this diwali sweets fresh for a month this is how you make sutarfeni dha