महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात. चला तर मग आज बनवुया खानदेशी मिरच्यांची भाजी
खानदेशी मिरच्यांची भाजी साहित्य
- १ वाटी तूरडाळ,
- साधारण एक वाटीच तुकडे होतील इतक्या हिरव्या मिरच्या (आपल्या आवडीप्रमाणे पोपटी किंवा लवंगी. पण मिरच्या अख्ख्याच ठेवायच्या आहेत)
- १ जुडी आंबट चुका किंवा चुका मिळाला नाही तर ३ हिरवे टोमॅटो
- २ मध्यम आकाराची काटेरी वांगी
- ७-८ लसूण पाकळ्या आणि १ इंच आलं यांची पेस्ट
- १ टेबलस्पून सुकं खोबरं, २ कांदे बारीक चिरून
- थोडी कोशिंबीर बारीक चिरून, २ टीस्पून काळा मसाला
- प्रत्येकी १ टीस्पून धणे-जिरे पूड, १ टेबलस्पून तेल
- मोहरी, हिंग, हळद, मीठ चवीनुसार
खानदेशी मिरच्यांची भाजी कृती
- तूरदाळ स्वच्छ धुवून एका भांड्यात घ्या. वांग्याचे आणि टोमॅटोचे मोठे तुकडे करून त्यात घाला. त्यात अख्ख्या हिरव्या मिरच्या घाला.
- तूरडाळीत नेहमीसारखं दुप्पट पाणी घालून कुकरला मऊ शिजवून घ्या.डाळ गरम असतानाच घोटा. नको असतील तर घोटण्याआधी मिरच्या काढून टाका.
- एका कढईत तेल गरम करा. नेहमीसारखी मोहरी-हिंग-हळद घालून फोडणी करा. त्यात कांदा घालून चांगला मऊ शिजू द्या.
- नंतर त्यात आलं-लसूण पेस्ट घालून २-३ मिनिटं चांगलं होऊ द्या. त्यातच सुकं खोबरं आणि कोथिंबीर घाला. हे सगळं मिश्रण चांगलं परतलं की घोटलेली डाळ घाला. चांगलं हलवून आपल्याला हवं तसं घट्ट-पातळ ठेवा.
हेही वाचा >> खान्देशी मसाला खिचडी; रात्रीच्या जेवणाला १० मिनिटांत बनवा अस्सल खानदेशी बेत
- ही भाजी जराशी घट्टच असते.आता त्यात काळा मसाला, धणे-जिरे पूड आणि मीठ घाला. चांगलं हलवून घ्या.
- मध्यम आचेवर उकळी येऊ द्या. भाजी चांगली उकळली की गॅस बंद करा.मिरचीची भाजी तयार आहे.