Shev Bhaji Recipe at home : महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. चला तर आज एक खानदेशी रेसिपी पाहू. जेवणात त्याच त्यात भाज्या खाऊन कंटाळा आला की एखादा पारंपारीक पदार्थ खावासा वाटतो. फरसाण किंवा शेव आपल्या सर्वांच्याच घरी असतेच. शेवची भाजी हा पारंपारीक पदार्थ खायला चविष्ट, झणझणीत असतो. अनेक ग्रामीण भागात पाहुण्याच्या ताटात शेवची भाजी आवर्जून वाढली जाते. ढाबा स्टाईल शेवभाजी बनवणे अतिशय सोपे असून त्यासाठी कोणत्याही तयारीची गरज नाही उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधून भन्नाट शेवभाजी बनवणे शक्य आहे. चला तर जाणून घेऊया काळ्या मसाल्याचा झणझणीत शेव रस्सा कसा बनवायचा.
काळ्या मसाल्याचा झणझणीत शेव रस्सा साहित्य
२०० ग्रॅम शेव तिखट
२ कांदे
१० ते १२ लसूण पाकळ्या
२ इंच आले
खडे मसाले (लवंग, दालचिनी, तमालपत्र, मीरे, मसाला वेलची)
सुक खोबरं
१ टेबलस्पून काळा मसाला (घरचा साठवणीतला)
१/२ टेबलस्पून गरम मसाला
१/४ कप कोथिंबीर
४ ते ५ हिरव्या मिरच्या
२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
४ टेबलस्पून तेल
पाणी गरजेनुसार
१ टीस्पून जीरे
काळ्या मसाल्याचा झणझणीत शेव रस्सा कृती
१. सर्वप्रथम गॅस चालू करा. त्यावर एक जाळी ठेवून कांदे आणि खोबरं भाजून घ्या. भाजून झाल्यावर गॅस बंद करावा. गार झाल्यावर कांदे सोलून, आणि देठ कापून घ्या.
२. कांदे चिरुन घ्या. खोबरं पण कापून घ्या. मिक्सरमध्ये कांदा,लसूण, आले, खोबरं, हिरव्या मिरच्या, खडे मसाले (लवंग, दालचिनी, तमालपत्र, मीरे, मसाला वेलची), कोथिंबीर, लाल तिखट, काळा मसाला, घालून बारीक वाटून घ्या.
३. मसाला वाटून तयार आहे. कढई तापत ठेवा. त्यात तेल घालावे. तेल तापल्यावर त्यात जीरे घाला. नंतर हळद घाला आणि लगेच बारीक वाटून घेतलेला मसाला घाला आणि त्याला तेल सुटे पर्यंत परतून घ्या. गरजेनुसार पाणी घालून घ्या व उकळी येऊ द्यावी.
हेही वाचा >> Mothers Day 2024: ‘आई’साठी बनवा स्पेशल शुगर फ्री बदाम बर्फी, जाणून घ्या रेसिपी
४. नंतर कोथिंबीर घालून परत एकदा उकळी येऊ द्यावी. आपला काळा मसाला रस्सा तयार आहे.
५. सर्व्ह करतांना त्यात भाजीची मध्यम तिखट शेव घालावी. भाकरी, चपाती किंवा फुलके बरोबर आस्वाद घ्यावा.
६. सर्व्ह करा.