गणपतीसाठी वेगवेगळ्या खिरापती केल्या जात असल्या तरी पहिला मान असतो तो खोबऱ्याच्या खिरापतीला. सुक्या खोबऱ्याची खिरापत आणि पंचखाद्याची खिरापत ही प्रसाद म्हणून वाटण्यासाठी पहिले केली जाते. अनेक घरांमध्ये गणपती उत्सवाची तयारी म्हणून आधी खिरापत तयार केली जाते. सुक्या खोबऱ्याची खिरापत असू देत किंवा पंचखाद्य दोन्ही आरोग्यास फायदेशीर असतात. गणेशोत्सवासाठी तुम्ही खिरापत करणार असाल तर ती कमीत कमी वेळात एकदम झटपट कशी करायची, त्याच्या या काही सोप्या रेसिपी बघून घ्या…
पाच वेगवेगळ्या खिरपत रेसिपी खालीलप्रमाणे
१. खिरापत करण्याची पहिली एकदम सोपी रेसिपी म्हणजे खोबरं आणि पिठीसाखर घालून केलेली खिरापत. यासाठी खोबऱ्याचे काप करून घ्या. ते भाजून घ्या आणि थंड होऊ द्या. थंड झाले की साखरेसोबत मिक्सरमधून फिरवून घ्या. एकदम बारीक पावडर करू नये. थोडे जाडेभरडेच ठेवावे.
२. या रेसिपीसाठीही खोबऱ्याचे काप करून ते भाजून घ्या. नंतर थोडी खसखस आणि बदाम भाजून घ्या. थंड झाल्यावर खोबरे, साखर, बदाम, खारिकचे तुकडे, खसखस असं मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्या
३. तिसऱ्या रेसिपीमध्येही भाजलेले खोबरे वापरायचे आहे. वेलची कढईत थोडी गरम करून घ्या. थंड झाल्यावर भाजलेले खोबऱ्याचे काप, डिंक पावडर, गुळ आणि वेलची मिक्सरमधून फिरवून घ्या.
४. सुकामेवा वापरूनही खिरापत करता येते. यासाठी काजू, बदाम, मनुका, अक्रोड, पिस्ते असा सगळा सुकामेवा थोडासा भाजून घ्या. त्यात थोडे खोबरेही भाजून टाका. आता हे सगळे भाजलेले पदार्थ थंड झाले की गूळ घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. गुळाऐवजी अंजीर किंवा खजूराचाही वापर करू शकता.
हेही वाचा >> कारले कांदा कुरकुरे चिवडा; कुरकुरीत, खमंग चिवडा करण्याची घ्या परफेक्ट रेसिपी
५. आता खिरापत करण्याची आणखी एक रेसिपी पाहू या. यासाठी आपल्याला २०० ग्रॅम ज्वारीच्या लाह्या, अर्धी वाटी डाळवं, अर्धी वाटी खोबऱ्याचे बारीक तुकडे, अर्धी वाटी गूळ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि २ टेबलस्पून साजूक तूप लागणार आहे. सगळ्यात आधी डाळवं, लाह्या, शेंगदाणे आणि खोबरे भाजून घ्या. त्यानंतर गूळ आणि तूप एकत्र गरम करून गुळाचा पाक करून घ्या. त्यात डाळवं, खोबरे, लाह्या, शेंगदाणे असं सगळं टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या…. खिरापत किंवा पंचखाद्य झालं तयार.