Konkani Sweet Dish : कोकणतातील अनेक पारंपारिक पदार्थ लोक आवडीने खातात. कोकणात नारळ मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे तिथे तुम्हाला नारळापासून बनवले जाणारे विविध पदार्थ खायला मिळतात. याच पदार्थांपैकी एक म्हणजे नारळाच्या दुधातील शेवया. तुम्ही जर कोकणात भेट देत असाल तर तुम्हाला अनेकांच्या घरी ह्या पारंपारिक पदार्थाचा आस्वाद घ्यायला मिळेल. तांदूळ, गुळ, नारळाचा वापर करत असल्याने ही रेसिपी खूप पौष्टिक आहे. इतकच नाही तर लहान मुल देखील नूडल्स समजून ती आवडीने खाऊ शकतात. या रेसिपीत तांदळाच्या पिठाऐवजी नाचणीचे पीठही वापरु शकता. चला तर मग अस्सल मालवणी नारळाच्या दुधातील शेवया कशा बनवायच्या याची रेसिपी जाणून घेऊ…
साहित्य
१५० ग्रॅम तांदूळ
१ ओला नारळ
१५० ग्रॅम गुळ,
१ चमचा वेलची पावडर
मीठ चवीनुसार
चकलीचे यंत्र (मध्यम शेवेची जाळी), मोदक उकाडायचे भांडे
कृती
सर्वप्रथम आदल्या दिवशी तांदूळ धुवून सुकवायचे आणि घरघंटीवर बारीक दळून आणा. यानंतर एक भांड्यात एक ग्लास पाणी उकळून ठेवा आणि त्यात चवीनुसार मीठ टाका. पाणी उकळले की त्यात तांदळाचे पीठ घालावे आणि सतत ठवळत रहा. मग झाकण ठेवून चांगल्याप्रकारे शिजवा.
यानंतर एका परातीत उकडलेले पीठ काढून चांगले नरम मळून घ्या. दुसरीकडे एका मध्यम आकाराच्या पातेल्यात किंवा मोदक उकडण्याच्या भांड्यात २ ग्लास पाणी तापत ठेवा. आता चकलीच्या साच्यातील शेवेची जाळी टाकून उकडलेल्या पीठाचा गोळा भरा आणि केळीच्या पानावर शेव पाडून घ्या. यानंतर मोदकाप्रमाणेच ७ ते ८ मिनिटे शेव उकडण्यासाठी ठेवा.
नारळाच्या दुधाची कृती
एका ओला नारळ किसून घ्या. त्यात पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून एका सुती कपड्यात टाकून त्यातील नारळाचा रस काढून घ्या. रस काढल्यावर पुन्हा एकदा त्यात थोडे पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवावे. आता पुन्हा रस काढावा. आता त्यात बारीक केलेला गुळ टाकून एकजीव करा. यानंतर शेवटी त्यात एक चमचा वेलची पावडर टाका. यानंतर केळीच्या पाण्यावर तयार शेवया आणि एका बाउलमध्ये नारळाचे दूध काढा. यानंतर शेवया नारळाच्या दुधात भिजवून खाण्याचा आस्वाद घ्या.