इडली साऊथ इंडियन पदार्थ असला तरीही जवळपास संपुर्ण भारतात तो आवडीने खाल्ला जातो. चवीने आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असण्यासोबतच, इडली ही एक अशी रेसिपी आहे जी कमी वेळात झटपट तयार करता येते. शिवाय आपल्याकडे नाश्त्याला इडली, डोसा, मेदू वडा, उत्तपा असे साऊथ इंडियन पदार्थ आवडीने खाल्ले जातात. कोणताही पदार्थ चवीसोबतच दिसायला चांगला असेल तर खाण्याचा आनंद दुप्पट वाढतो. इडली दिसायला पांढऱ्या शुभ्र रंगाची खाण्यासाठी मऊ असते. इडली ही उडीद डाळ, तांदूळ भिजवून, बारीक वाटून, आंबवून तयार केली जाते. इडली हा एक असा एक पदार्थ आहे जो आपण कधीही खाऊ शकतो.
दरम्यान, इडली खाताना ती योग्य पद्धतीने फुलून आली तरच खायला मजा येते. फुगलेली, मऊ आणि पांढरीशुभ्र इडली खाण्यात एक वेगळाच आनंद आहे. त्यामुळे प्रत्येत गृहीणी इडली करताना खूप काळजी घेत असते. त्यामुळे त्या डोशाचे पीठ तयार करताना त्यामध्ये डाळ व तांदूळ यांचे प्रमाण व्यवस्थित घेतात कारण जर इडली डोशाचे पीठ फसले तर मनासारख्या इडल्या तयार होत नाहीत. मात्र अनेक महिलांनी हवी ती काळजी घेतली तरी त्यांच्या इडल्या फुगत नाहीत, किंवा त्यांच्या मनासारख्या त्या बनत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला इडली बनवण्याबाबतच्या काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही बनवलेली इडली तुमच्या मनासारखी फुगेल.
हेही वाचा- कुरकरीत, चटपटीत पोह्याचे कटलेट! मुलांच्या डब्यासह नाश्त्यासाठी झटपट करु शकता तयार, ही घ्या रेसिपी
- इडल्या फुगून येण्यासाठी इडलीच्या पिठामध्ये क वाटी शिजवलेला भात घाला.
- इडल्या कडक किंवा जाड होत असतील तर इडलीचे पिठ तयार करताना त्यात एक वाटी भिजवलेले पोहे घाला. या भिजवलेल्या पोह्यांमुळे इडल्या फुगण्यास मदत होते.
- इडलीमध्ये एक चमचा इनो घालून त्यावर जरासा लिंबाचा रस मिसळा आणि इडलीचे पिठ ढवळा, यामुळेही इडल्या फुगून येतात.
- इडलीच्या पिठासाठी पॉलिश केलेली उडीद डाळ वापरणं टाळा कारण पॉलिश करण्यासाठी फॅक्टरीमध्ये त्यावर प्रोसेस करण्यात येते. या प्रोसेसमध्ये डाळीमधील आवश्यक बॅक्टेरिआ नष्ट होतात. डाळीतील हे बॅक्टेरिआ इडलीचे पीठ आंबवण्याची महत्वाची प्रक्रिया करतात.
- इडली व्यवस्थित होण्यासाठी इडली राईस अथवा इडली रव्याचा वापर करा.
- इडली भांड्यात पीठ घालण्यापूर्वी इडलीच्या साच्यांना तेल लावावे ज्यामुळे स्टीम झाल्यावर इडली लगेच निघते आणि भांड्याला चिकटून राहत नाही.
- इडली फक्त पंधरा ते वीस मिनिटेच स्टीम करा, जास्त उकडल्यास इडली कोरडी आणि कडक होऊ शकते.
- इडलीच्या पिठामध्ये टेबल सॉल्ट ऐवजी रॉक सॉल्ट वापरा. कारण त्यामुळे इडलीच्या आंबण्याच्या प्रोसेसमध्ये अडथळा येणार नाही. तुम्ही इडलीचे पीठ तयार करताना अथवा ते आंबल्यावर असं कधीही मीठ त्यात टाकू शकता.