झुणका म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग तो तव्यावर केलेला झुणका असो किंवा कांदा घालून केलेलं पातळ पिठलं असो. झुणका खाण्याती एक वेगळीच मजा असते. गावाकडे रानात गेल्यावर झुणका कांदा आणि भाकरी खाणं म्हणजे अनेकांच्या आवडीची गोष्ट असते. शिवाय ऐनवेळी घरात काही भाजी नसेल तर पटकण करता येणारा पदार्थ म्हणजे झुणका. डाळीच्या पीठापासून अगदी पटकण केला जाणारा हा पदार्थ आहे.
महाराष्ट्रातील विविध भागात झुणका करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. तुम्हालाही हा पदार्थ खायची किंवा बनवायची इच्छा आहे. मात्र, तो बनवता येत नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही. कारण हा झुणका कसा बनवतात याबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर चला जाणून घेऊया महाराष्ट्रीयन लोकांच्या आवडीचा झुणका कसा बनवायचा ते.
हेही वाचा- ओल्या जवळ्याची कुरकुरीत भजी कधी खाल्लीये का? नसेल तर आजचं घरी बनवा, पाहा रेसिपी
झुणका बनवण्यासाठी लागणारे साहित्य –
४ ते ५ मोठे चमचे तेल, १ मोठा चमचा मोहरी, १ चमचा बारीक कापलेलं आलं आणि लसूण, कोथिंबीर, एक कापलेला कांदा, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हळद, २ मोठे चमचे लाल तिखट, १ पातीचा कांदा कापलेला, १५० ग्रॅम बेसन आणि पाणी.
हेही वाचा- पोळ्या रात्रीपर्यंत मऊ-लुसलुशीत राहण्यासाठी आणि टम्म फुगण्यासाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या टिप्स
झुणका करण्याची कृती –
सर्वात पहिल्यांदा एका भांड्यात तेल गरम करून घ्या. त्यात मोहरीची फोडणी द्या आणि त्यावरच बारीक कापलेले आलं-लसूण टाका. मग कोथिंबीर टाकून त्यावर बारीक केलेला कांदा टाका. हे चांगले परतवून घ्या. त्यानंतर याच मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाका, त्यावर हळद, लाल तिखट-गरम मसाला आणि बारीक कापलेला पातीचा कांदा घाला. पातीचा कांदा जरासा मऊ झाल्यावर त्यात बेसन टाका, हे सारे मिश्रण एकत्र करून घ्या. वरतून पाण्याचा हबका मारा जेणेकरून बेसनाला चांगली वाफ येईल अशा पद्धतीने तुमचा आवडीचा झुणका तयार होईल.