Maha Navami Kanya Pujan 2024 Special Prasadacha Sheera Recipe : आज ११ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्रीचा महान सण आहे. या वर्षी अष्टमी व नवमी तिथी एकाच दिवशी येत आहेत. त्यामुळे आजच अनेकांच्या घरी कन्या पूजनदेखील केले जाईल.

हिंदू धर्मात नवमी तिथीला खूप महत्त्व आहे. नवरात्रीत नऊ दिवस उपवास केल्यानंतर नवमीच्या दिवशी नऊ मुलींना गोडधोड जेवण दिल्यास दुर्गामातेचा आशीर्वाद मिळतो आणि भक्तांची सर्व दुःखे दूर होतात, असे मानले जाते. त्यामुळे नवमी तिथी आणि कन्या पूजनानिमित्त आम्ही तुम्हाला अवघ्या १० मिनिटांत मऊ लुसलुशीत, गोड प्रसादाचा शिरा कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ ही रेसिपी …

Dasara 2024 Wishes : दसऱ्यानिमित्त नातेवाईक प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा अन् कार्ड्स; पाहा लिस्ट

प्रसादाचा शिरा बनविण्यासाठी लागणारे साहित्य

१) १ कप जाड रवा
२) १ वाटी तूप
३) १ वाटी साखर
४) सुका मेवा (बदाम, मनुका, काजू, पिस्ता इ.)
५) वेलची पावडर
६) जायफळाचा तुकडा
७) १/२ कप केशर दूध

प्रसादाचा शिरा बनविण्याची कृती

प्रसादाचा शिरा बनविण्यासाठी सर्वप्रथम कढईत रवा टाकून, मंद आचेवर तो हलकासा भाजून घ्या. रव्याचा रंग हलकासा लालसर झाल्यावर तो एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून, थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवा.

तोपर्यंत त्याच कढईत दोन चमचे तूप घालून, त्यात घेतलेले सुक्या मेव्याचे पदार्थ टाकून तळून घ्या. सुक्या मेवा भाजून झाल्यावर कढईत एक वाटी तूप घालून, त्यात भाजलेला रवा घालून परतून घ्या.

रव्याचा रंग पुन्हा थोडासा लालसर झाल्यावर, त्यात अंदाजे तीन कप पाणी घाला आणि मध्यम आचेवर ढवळून शिजू द्या. त्यासाठी कढईवर झाकण ठेवा.

रवा काही मिनिटांत चांगला फुगल्यानंतर त्यात साखर घालून पुन्हा चांगला परतून घ्या. साखर विरघळल्यानंतर त्यात थोडेसे केशर दूध घालून ढवळा. त्यानंतर भाजलेला सुका मेवा बारीक चिरून घ्या आणि त्यात मिसळा. शेवटी किसलेले जायफळ व वेलची पूड घाला. आता पुन्हा एकदा सर्व मिश्रण चांगले परतून घ्या आणि कढईवर झाकण ठेवा. अशा प्रकारे प्रसादाचा शिरा तयार आहे.