दिवसभर थकून घरी आल्यावर, मस्त कालवलेल्या मऊ भाताबरोबर, वरण, मीठ, लिंबू आणि त्यावर सोडलेली तुपाची धार असे जेवण जेवणे म्हणजे अनेकांसाठी स्वर्गसुख असते. यासंगल्याबरोबर फक्त थोडे आंब्याचे लोणचे किंवा पापड असला म्हणजे वाह! विचार करूनच तोंडाला पाणी सुटलं… खरंतर भातावर घेतल्या जाणाऱ्या वरणाचे कितीतरी प्रकार असतात. यांची नावं सांगायची झाली तर गूळ घालून बनवलेले गोडं वरण, खमंग फोडणी दिलेले फोडणीचे वरण, टोमॅटो घालून केलेली आमटी- डाळ; जेवढी नावं घेऊ तेवढी कमीच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशात महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात या डाळीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी आज आपण कोकणी पद्धतीने बनवलेली जाणारी ‘वाटणाची’ किंवा ‘वाटपाची’ डाळ कशी बनवायची ते पाहणार आहोत. या पदार्थाच्या नावाप्रमाणेच, या डाळीत वाटण घातले जाते. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर stylishachari नावाच्या अकाउंटने या सुंदर रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानुसार ही वाटपाची किंवा वाटणाची डाळ कशी बनवायची ते पाहू.

हेही वाचा : Recipe : अशा पद्धतीने कारल्याच्या काचऱ्या बनवाल तर, कडवटपणा झटक्यात विसरून जाल! ही रेसिपी पाहा…

वाटपाची डाळ रेसिपी :

साहित्य

तूर डाळ
खोबरं
कोथिंबीर
कढीपत्ता
मिरची
लसूण
जिरे
हळद
हिंग
मीठ
कैरी
पाणी
तेल

कृती

  • सर्वप्रथम पातेल्यात किंवा कुकरमध्ये तुरीची डाळ शिजवून घ्यावी. डाळ शिजवताना त्यामध्ये थोडी हळद घालावी.
  • डाळ शिजेपर्यंत वाटण बनवून घेऊ.
  • यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात ओले खोबरे, मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरे, हळद आणि थोडे पाणी घालून सर्व पदार्थ व्यवस्थित वाटून घ्यावे. डाळीची वाटण तयार आहे.
  • आता एक पातेलं किंवा कढई गॅसवर ठेवा.
  • त्यामध्ये चमचाभर तेल घालून ते तापू द्यावे.
  • तेल तापल्यानंतर, त्यामध्ये बारीक चिरलेले अथवा आवडत असल्यास ठेचलेले लसूण आणि कढीपत्त्याची पाने घालून खमंग फोडणी करून घ्यावी.
  • लसणीचा रंग बदलेपर्यंत ते परतून घ्यावे.
  • आता यामध्ये तयार केलेले वाटण घालून, वाटणाला काही मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या.
  • वाटण शिजेपर्यंत तयार डाळ रवी किंवा डावाच्या मदतीने छान घोटून घ्यावी.
  • आता हे ही घोटलेली डाळ शिजत असणाऱ्या वाटणामध्ये घालून घ्या.
  • डाळ आणि वाटण व्यवस्थित ढवळून घेऊन त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालावे. परंतु, डाळीत जास्त पाणी घालून तिला खूप पातळ करू नका.
  • आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या.
  • सर्वात शेवटी कैरीच्या बारीक फोडी चिरून या डाळीत घालून घ्या. यामुळे वाटणाच्या डाळीला मस्त आंबटसर चव लागेल.
  • डाळीत घालेली कैरी शिजेपर्यंत तिला उकरून घ्या.
  • वाटणाच्या डाळीला मस्त उकळी आल्यानंतर आणि कैरी शिजल्यानंतर कढईखालील गॅस बंद करू घ्या.
  • तयार झालेली आपली कोकणी वाटपाची डाळ मऊ भात, लोणचं आणि कुरकुरीत पापडाबरोबर खावी.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @stylishachari नावाच्या अकाउंटने या कोकणी, वाटणाच्या किंवा वाटपाच्या डाळीचा रेसिपी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ४६०K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrian food how to make kokan special vatapachi dal check out this amazing recipe dha