Maharashtrian Recipe : गरमागरम कुरकुरीत खमंग भजी खायला कोणाला आवडत नाही. पावसाळाच नाही तर इतर वेळीही अनेक जण भजी आवडीने खातात. आतापर्यंत तुम्ही कांदा भजी, बटाटा भजी, मेथी भजी, पालक भजी, कोंथिंबीर भजी असे भजीचे अनेक प्रकार खाल्ले असतील. पण, आज आम्ही तुम्हाला कुरमुऱ्यांपासून कुरकुरीत खमंग भजी कशी बनवायची हे सांगणार आहोत. अगदी काही मिनिटांत बनवून होणारी ही भजी मोठेच काय अगदी लहान मुलेही आवडीने खातील. चला तर मग जाणून घेऊ गरमागरम कुरमुऱ्याच्या खमंग भजीची रेसिपी ….
साहित्य
१ वाटी कुरमुरे (मुरमुरे)
१ उकडून किसलेला बटाटा
१ मध्यम आकारात चिरलेला कांदा
१ हिरवी मिरची, ४ लसूण पाकळ्या, थोडे आले यांची पेस्ट
१०-१२ कढीपत्त्याची पाने
१/२ टीस्पून ओवा
१ टीस्पून तीळ
१ टीस्पून धणे-जिरे पावडर
कोथिंबिरीची पाने
चवीनुसार मीठ
२ चमचे बेसन
१/4 टीस्पून हळद पावडर
कृती
सर्वप्रथम एका भांड्यात कुरमुरे घ्या. त्यात उकडून किसलेला बटाटा, चिरलेला कांदा, आले-लसूण-हिरव्या मिरचीची पेस्ट, कढीपत्त्याची चिरलेली पाने, ओवा, तीळ, जिरे पावडर, कोंथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद आणि बेसन पीठ टाकून हे सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्या.
हाताला थोडे पाणी लावून हे मिश्रण नीट एकत्र करा. त्यानंतर एका कढईत तेल गरम करा. आता तयार मिश्रणाचे तुम्ही भजीसारखे गोळे करून तेलात सोडा (तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यापासून वडेदेखील बनवू शकता.) भजी चांगली सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर ही भजी सॉस, हिरव्या चटणीबरोबर खाण्यासाठी सर्व्ह करा. ही रेसिपी @maharashtrian_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.