थंडीचे दिवस आणि जानेवारी महिन्यात नवं वर्ष सुरू झाल्यानंतर सर्वात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची विशेष भाजी तयार करण्यात येते. या दिवसात भरपूर प्रमाणात भाजीपाला मिळतो आणि शरीराला उर्जेचीही गरज असते. यंदा मकर संक्रांत १४ जानेवारी २०२३ रोजी म्हणजे रविवारी साजरी केली जाणार आहे. देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा होतो. पण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी या दिवशी भोगीची भाजी बनवण्याची परंपरा असते. तुम्हाला टेस्ट सोबतच आरोग्यासाठी उत्तम असलेली ही भाजी तुम्हालाही बनवायची असेल तर ही रेसिपी जाणून घ्या…
भोगीची भाजी साहित्य :
- वांगी – तीन, वर्णे – अर्धी वाटी, ताजे मटार – अर्धी वाटी
- हिरवे हरभरे – अर्धी वाटी, भिजवलेले कच्चे शेंगदाणे – अर्धी वाटी
- चिरलेली गाजरं – दोन, चिरलेला कांदा – एक
- तीळ – एक टेबल स्पून, खोवलेलं ओलं खोबरं – अर्धी वाटी
- चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी, तिखट – दोन चमचे
- मीठ – चवीनुसार, हळद, हिंग – प्रत्येकी अर्धा चमचा
- तेल – पाव वाटी, गूळ – दोन चमचे
- गरम मसाला पावडर – एक चमचा
भोगीची भाजी कृती :
- वांगी, गाजरं चिरून घ्या. सर्व भाज्या एकत्र करा. भांडय़ात तेल तापवा, त्यात कांदा परतून घ्या.
- हिंग, हळद घाला. भाज्या घालून छान परतून घ्या. तिखट, मीठ, गरम मसाला पावडर, तीळ, खोबरं घालून छान एकजीव करा.
- गूळ घाला. गरजेनुसार पाणी घालून शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर घाला.
- भोगीच्या दिवशी ही भाजी करतात. बाजरीची भाकरी, चटणी, मेथीच्या भाजीसोबत ही भाजी नैवेद्यासाठी करतात.
भोगीची भाजी खाण्याचे फायदे
- भोगीची भाजी बनवताना यामध्ये गाजर, वांगे, घेवडा, तीळ आणि हरभरा या भाज्यांचा समावेश होतो आणि शेंगदाणेही घातले जातात.
- शेंगदाणे आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते. याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळते.
- वांगं हे वातूळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असे सांगण्यात येते मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत वा वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते.