Makar Sankranti Special Recipe : मकर संक्रातनिमित्त अनेकांच्या घरात तिळाचे लाडू तयार केले जातात. जे चवीला इतके छान लागतात की एकाच वेळी आपण चार पाच लाडू खाऊ शकतो. पण हे लाडू खाण्यासाठी जरी गोड असले तरी तयार करायला थोडे अवघड असतात, यात जर गुळाचा पाक नीट नाही टाकला तर लाडू खूप घट्ट होतात, त्यामुळे यंदा लाडूबरोबर तुम्ही तिळाच्या वड्या ट्राय करुन पाहू शकता. तिळाच्या वड्या बनवायला लाडूपेक्षा थोड्या सोप्या असतात. त्यामुळे पाहू खुसखुशीत तिळाच्या वड्या कशा बनवायच्या याची रेसिपी…
तिळाच्या वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट – अर्धा कप
किसून भाजलेले सुके खोबरे – अर्धा कप
तिळ – अर्धा कप
किसलेला गूळ – पाऊण कप
तूप – अर्धा टेस्पून
वेलचीपूड – अर्धा टिस्पून
सुकामेवा
कृती
तीळ लालसर रंगाचे होईपर्यंत खमंग भाजून घ्या. त्यातील अर्धे तीळ मिक्सरमध्ये लावून चांगले भरड वाटून घ्या. आता एका कढईत गूळ घालून बारीक गॅसवर विरघळून घ्या. तयार गुळाच्या पाकात भाजून वाटलेले तीळ, भाजलेले तीळ, शेंगदाण्याचे कूट, तूप, दूध, व वेलदोड्याची पूड घाला. सर्व पदार्थ चांगले मिक्स करुन त्याचा गोळा तयार करा. आता पोळपाट- लाटण्याला तूप लावा आणि तयार गोळा पोळपाटावर ठेऊन अंदाजे अर्धा से. मी. जाड लाटून घ्या. वरून खोबरे पसरा आणि तयार पोळी हलकीशी परत एकदा लाटा. त्यानंतर त्याचे सुरीने तुमच्या आवडीच्या आकाराचे काप करून घ्या.