नवीन वर्षातील, महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जाणारा सर्वात पहिला सण, म्हणजेच मकर संक्रांत अगदी दोन दिवसांवर आलेला आहे. संक्रांतीच्या आदल्यादिवशी, म्हणजेच भोगीच्या दिवशी हिवाळ्यातील वांगी, वाल, पावटे, गाजर इत्यादी भाज्या वापरून, भोगीची भाजी बनवली जाते. तर दुसऱ्यादिवशी काळ्या रंगाचे कपडे घालून, पतंग उडवत धमाल केली जाते आणि सणानिमित्त एकमेकांना तिळगुळ दिले जातात. आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये आपण कोणत्या सणाला काय पदार्थ खात असतो, याला फार महत्त्व असते. म्हणजे संक्रांत ही थंडीच्या दिवसांमध्ये साजरी केली जाते. अशा वातावरणामध्ये आपल्या शरीराला उब देणारे, सांध्यांना वंगण देणारे, लोह वाढवणारे पदार्थ म्हणजेच तीळ आणि गूळ यांपासून बनवलेले तिळगुळ एकमेकांना दिले जातात.
आता संक्रांतीच्या दिवशी तुम्ही घरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवला असेल; तर घरी आलेल्या पाहुण्यांना बाहेरचे विकतचे लाडू देऊ नका. सुट्टीच्या दिवसाचा फायदा करून घरी १५ मिनिटांमध्ये तयार होणारी ही स्वादिष्ट आणि पौष्टिक तिळगुळाची चिक्की बनवून बघा. सोशल मीडियावरील @nehadeepakshah या इन्स्टाग्राम अकाउंटने झटपट बनणारी ही साधी-सोपी रेसिपी शेअर केली आहे. काय आहे प्रमाण आणि कृती पाहा.
हेही वाचा : गरमागरम चहाला द्या ‘मसालेदार’ बिर्याणी तडका; “याला चहा नका म्हणू, हा…” म्हणत नेटकऱ्यांनी रेसिपीवर दिल्या प्रतिक्रिया…
तिळगुळाची चिक्की
साहित्य
१०० ग्राम तीळ
१०० ग्राम मिक्स सुकामेवा
२ चमचे गुलाबाच्या पाकळ्या [वाळवलेल्या]
१ लहान चमचा वेलची पूड
२०० ग्राम गूळ
१ चमचा तूप
कृती
सर्वप्रथम पॅनमध्ये तीळ आणि सुकामेवा वेगवेगळे भाजून घ्या.
त्याच पॅनमध्ये आधी चिक्कीसाठी गुळाचा पाक बनवून घेऊ. त्यासाठी पॅनमध्ये तूप घालून नंतर गूळ घालून घ्या.
आता गूळ विरघळल्यानंतर, एका पाण्याच्या बाऊलमध्ये विरघळलेल्या गुळाचे काही थेंब घालून बघा. गुळाचे कण जर काचेसारखे तुटले तर, तो चिक्कीसाठी योग्य आहे असे समजावे.
गुळाचा पाक तयार केल्यावर त्यामध्ये भाजलेले तीळ, सुकामेवा गुलाबाच्या पाकळ्या आणि वेलची पूड घालून सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घ्या.
पदार्थ एकजीव झाल्यानंतर, गरम असतानाच चिक्कीचे मिश्रण बटर पेपरवर काढून एकसमान पसरून घ्या.
आता या मिश्रणाला तुम्हाला हवा तसा चौकोनी किंवा पतंगाचा आकार देऊ शकता.
चिक्की थंड झाल्यावर मऊ पडू नये यासाठी, तिला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावी.
हेही वाचा : Recipe: कडू-कडू कारलीदेखील अगदी आवडीने अन् गोडीने खाल; पाहा ही मसालेदार कारल्याची रेसिपी
टिप – गुळाचा पाक तयार करत असताना गॅस मंद आचेवर ठेवावा.
इन्स्टाग्रामवर @nehadeepakshah या अकाउंटने शेअर केलेल्या तिळगुळ चिक्की रेसिपीला आत्तापर्यंत २६४K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.