Makar sankranti Til ladoo recipe: तिळाचे लाडू आपल्याला सर्वानाच आवडतात. एक लाडू काहून काही केल्या पोट भरत नाही मग एक -दोन -तीन असे कितीचं लाडू आपण फस्त करून टाकतो. बच्चे कंपनीला तर मकर संक्रांत म्हटली की, दोन गोष्टी फार आवडतात एक म्हणजे पतंग आणि दुसरे म्हणजे तिळगुळाचे लाडू. तीळ आणि गूळ एकत्र करून बनवलेले लाडू म्हणजे तिळगुळाचे लाडू. आजकाल बाजारात तिळगुळाचे लाडू सहज उपलब्ध असतात, पण घरी बनवलेल्या लाडवांची चव विकतच्या लाडवांना कुठून येणार? म्हणून आपल्या घरीच लाडू बनवले जातात.पण बऱ्याचदा घरी लाडवांचा बेत कधी कधी फसू शकतो आणि त्याला निमित्त असतं, गुळाचा पाक. पाक व्यवस्थित तयार झाला की लाडू व्यवस्थित बांधले जातात. गुळाचा पाक फसला की लाडवांचा बेतही फसला हे समजून जा.
तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे साहित्य
१/२ किलो तिळ
१/२ किलो चिकीचा गूळ
१ ते दिड वाटी शेंगदाण्याचे कूट
१ वाटी किसून भाजलेले सुकं खोबरं
१/२ वाटी चण्याचं डाळं
१ चमचा वेलची पूड
१ ते २ चमचे तूप
तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे कृती
सगळ्यात आधी तिळ व्यवस्थित भाजून घ्यावेत. गॅसवर एक भांडे ठेवाव. त्या भांड्यात चिकीचा गूळ घ्यावा. थोडे तूप घालावे. गूळाचा गोळीबंद पाक करा,सतत ढवळत राहा.
गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो. पाक गोळीबंद झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा पाक फेसाळला की गॅस बारीक करावा. एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा.
बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा “टण्णं” असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे.
पाक गोळीबंद झाला कि त्यात भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, चण्याच्या डाळा, वेलची पूड घालून नीट ढवळा आणि गरम असतानाच लाडू वळा.
हेही वाचा >> चविष्ट अन् पौष्टिक, निरोगी आरोग्यासाठी हिवाळ्यात करा नाचणीच्या पिठाचे सूप; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
लाडू वळताना हाताला थोडे तूप लावा ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही. तयार आहेत गरमागरमा स्वादिष्ट तिळाचे लाडू