वाढदिवस साजरा करताना केक नाही, असं तर कधी होतच नाही. ज्या व्यक्तीचा वाढदिवस असतो, त्यासाठी आपण त्याच्या आवडीच्या चवीचा केक आणतो. साधारणपणे चॉकलेट, व्हॅनिला, ब्लॅक फॉरेस्ट, बटर स्कॉच या चवीचे केक मोठ्या प्रमाणात आणले जातात. त्यापलीकडे सध्या रसमलाई केक, गुलाबजाम केकदेखील बरीच मंडळी आवडीने खात आहेत. अशातच सोशल मीडियावर चहाप्रेमींसाठी ‘चाय केक’ची ही भन्नाट रेसिपी फिरताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टाग्रामवरील @sharnkaur_ या सोशल मीडिया हँडलने बिनाअंड्याचा चाय केक ही रेसिपी शेअर केली आहे. ही रेसिपी तीन भागांमध्ये तयार होते. त्यातील पहिला भाग म्हणजे केक तयार करणे, दुसरा भाग- चहा तयार करणे आणि शेवटी तिसऱ्या भागात केकला लावण्यासाठी बटरक्रीम तयार करून घेणे. वरकरणी पाहायला अवघड वाटणारी ही रेसिपी करण्यासाठी मात्र फार काही अवघड नाही. चला, तर मग चाय केक बनवण्याची काय रेसिपी आहे ते पाहू.

पाहा चाय केक कसा बनवायचा?

हा केक तीन भागांमध्ये बनत असल्यामुळे सगळ्यात आधी केकसाठी लागणारे साहित्य बघू.

हेही वाचा : सणासुदीच्या दिवसातदेखील वाढणार नाही वजन! डॉक्टरांनी सांगितलेला हा एक उपाय करा…

साहित्य :

३ कप मैदा [self-rising flour]
१ छोटा चमचा बेकिंग पावडर
१/४ छोटा चमचा बेकिंग सोडा
१ कप हलकी ब्राऊन साखर
२ कप घरी बनवलेला चहा
१ छोटा चमचा व्हिनेगर
१/२ कप दही
१/२ कप ऑलिव्ह तेल

बटर क्रीमसाठी लागणारे साहित्य :

१ कप बटर
२ कप पिठीसाखर
१ छोटा चमचा कॅरॅमल
चहा

चहासाठी लागणारे सहित्य :

१/४ कप पाणी
३ वेलची
२ लवंग
२ चमचे चहा पावडर किंवा २ टी बॅग्स
३ कप दूध

सगळ्यातआधी आपण चहा तयार करून घेऊ.

आपण नेहमी चहा करतो त्याप्रमाणे १/४ कप पाणी घेऊन त्यामध्ये वेलची, लवंग व चहा पावडर किंवा टी बॅग्स टाकून एकदा उकळी येऊ द्या. त्यानंतर चहामध्ये दूध घालून, पुन्हा एकदा उकळी आणून चहाखालील गॅस बंद करून, चहा गाळून घ्या. केकसाठी लागणारा चहा तयार आहे.

हेही वाचा : Video : घरात नको असलेल्या या गोष्टीने सजवा तुमचे घर; पाहा दिवाळी सजावटीसाठी हे सुंदर DIY

आता पाहू केक कसा तयार करायचा?

सर्वप्रथम ओव्हनला ३५० डिग्रीवर प्री-हिट [Pre-Heat] करून घ्या.

त्यानंतर केक बेक करण्याच्या भांड्याला बटर किंवा तेल व्यवथित लावून घ्या. आता एका वेगळ्या भांड्यामध्ये दोन कप गार झालेला चहा ओतून, त्यामध्ये एक छोटा चमचा व्हिनेगर घालून हे मिश्रण १० मिनिटांसाठी बाजूला ठेवा.

हे मिश्रण १० मिनिटांनतर घट्ट झाल्यावर ते एका खोलगट भांड्यामध्ये काढून घेऊन, त्यामध्ये दही, ऑलिव्ह तेल घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. आता या मिश्रणामध्ये मैदा [self-rising flour], बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, ब्राऊन साखर असे सगळे कोरडे पदार्थ चाळून एकत्र करा. आता हे एकजीव झालेले मिश्रण बटर लावलेल्या बेकिंगच्या भांड्यामध्ये ओतून घेऊन, ते २५ मिनिटांसाठी बेक करून घ्या.

बटर क्रीम तयार करण्याची कृती

बटर, पिठीसाखर व कॅरॅमल व्यवस्थित फेटून घ्या. व्यवस्थित फेटल्यानंतर हे क्रीम फुलून अतिशय हलकं होतं.

आता केक तयार करण्यासाठी सगळ्या गोष्टी तयार आहेत.

चाय केक तयार करण्याची शेवटची पायरी

बेक होऊन आलेला केक पूर्णपणे गार झाल्यानंर केकमध्ये काटा-चमच्याने लहान लहान छिद्र पाडून, त्यामध्ये १/४ कप चहा ओतून घ्या. आता केकच्या वरच्या भागावर, तयार केलेल्या बटर क्रीमचा थर लावून घ्या. त्यावर सजावटीसाठी चॉकलेटचा चुरा, वेलची पूड पसरवून घ्या.

बघा तयार आहे तुमचा ‘चाय केक’. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @sharnkaur_ या हँडलने ‘चाय केक’ची ही रेसिपी शेअर केली असून, अजूनही अनेक रेसिपींचे व्हिडीओ शेअर केलेले आहेत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make amazing chai cake for chai lovers birthday check out this trending eggless cake recipe dha