दुपारचा चहा आणि रात्रीचे जेवण यांच्यामधली जी वेळ असते, त्यात काहीतरी मस्त आणि वेगळं असं खावंसं वाटत. कधी चाट तर कधी वडापाव, भजी किंवा काहीच नाही तरी नूडल्ससारखे चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशा वेळी घरी उपलब्ध असणाऱ्या गोष्टीचा वापर करून जर तुम्हाला बाहेर मिळतात तसे स्प्रिंग रोल्स पाच मिनिटांत बनवता आले तर? या प्रश्नांसोबत त्याचं उत्तरदेखील इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @mymom_taughtmethis या अकाऊंटने या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या स्प्रिंग रोल्सची रेसिपी शेअर करून दिले आहे.
विशेष म्हणजे ही रेसिपी एका चिमुकल्याने बनवली आहे. त्याने स्प्रिंग रोल्स बनवण्यासाठी पापडाचा वापर केला आहे. आता ही पाच मिनिटांत तयार होणाऱ्या स्प्रिंग रोलची रेसिपी काय आहे ते पाहू.
पापड स्प्रिंग रोल्स रेसिपी
साहित्य
उडदाचे पापड
सिमला मिरची
कोबी
शेजवान चटणी
तेल
कृती
सगळ्यात पहिले एका पॅनमध्ये थोडं तेल टाकून घ्या. आता त्यामध्ये बारीक आणि उभी चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेला कोबी आणि शेजवान चटणी मिसळून सर्व गोष्टी छान परतून घ्या. ही भाजी पूर्णपणे न शिजवता, आवडत असल्यास थोडी कुरकुरीत ठेवली तरीही चालेल.
आता एका बाउलमध्ये पाणी घ्या. या पाण्यात उडदाचा एक पापड भिजवून व्यवस्थित ओला करून घ्या. आता या ओल्या केलेल्या उडदाच्या पापडामध्ये तयार केलेली भाजी घालून पापडाची गुंडाळी करून, पापड सगळीकडून घट्ट बंद करून घ्या.
हेही वाचा : या पाच सोप्या हॅक्स ठेवतील इडली पात्र चकचकीत; पाहा भांड्यांना मिनिटांत स्वच्छ करतील या टिप्स…
मगाशी वापरलेल्या तव्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्या. तेल तापल्यानंतर पापडाच्या तयार रोल्सची बंद केलेली बाजू तव्यावर ठेवून सोनेरी होईपर्यंत परता. तसेच दुसऱ्या भागासोबतही करा. दोन्ही बाजूंनी पापड छान सोनेरी झाल्यानंतर एका ताटलीत काढून घ्या. तयार आहेत आपले झटपट बनणारे पापड स्प्रिंग रोल्स. हे पापड स्प्रिंग रोल्स टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणीसोबत खायला मस्त लागतील.
या पापडांमध्ये तुम्ही रंगीत सिमला मिरची किंवा घरात तयार असलेली भाजी घालूनदेखील बनवू शकता.