आपल्याकडे, सण-समारंभ किंवा आता सुरू असलेला दिवाळी सण म्हणा, अशा खास दिवसांसाठी घरात गोडाचे हे काही ठरावीक पदार्थ हमखास बनवले जातात. त्यामध्ये साधारणपणे गुलाबजाम, शिरा, गाजर किंवा दुधी हलवा, असे पदार्थ असतात. पण यंदाच्या दिवाळीत जर तुम्हाला पाडवा किंवा भाऊबीजेला सगळ्यांसाठी कोणता वेगळा आणि खास पदार्थ बनवायचा असेल, तर त्याला शहाळ्याचा हलवा हा एक उत्तम व मस्त पर्याय ठरू शकतो.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @chefvenky_ या हँडलने आपल्या अकाऊंटवरून, शहाळ्याच्या हलव्याची ही साधी सोपी रेसिपी शेअर केली आहे. या रेसिपीच्या व्हिडीओला २८५ हजार व्ह्युज मिळाले आहेत. हा हलवा बनावण्यासाठी साधारण ३० ते ४५ मिनिटांचा वेळ लागू शकतो.
गाजर हलवा, दुधी हलवा, मुगाचा हलवा अशा चविष्ट हलव्यांच्या यादीमध्ये तुम्ही या नवीन, शहाळ्यापासून बनवल्या जाणाऱ्या हलव्याच्या रेसिपीची भर घालू शकता. कसा बनवला जातो हा सोपा आणि झटपट तयार होणारा शहाळ्याचा हलवा बघा.
हेही वाचा : महिनाभर टिकेल दिवाळीची ‘ही’ मिठाई! पाहा कशी तयार होते ही राजस्थानी मिठाई….
शहाळ्याच्या हलव्याची रेसिपी
साहित्य :
एक मोठ्या आकाराचे शहाळे [१ लिटरचे]
१२० ग्रॅम कॉर्नफ्लोअर
३०० ग्रॅम साखर
काजू
बदाम
वेलची
तूप
शहाळ्याची मलाई/खोबरे
कृती :
सर्वप्रथम शहाळं फोडून त्यातील पाणी एका पातेल्यात काढून घ्या. शहाळं घरी फोडणं शक्य नसल्यास, बाहेरून फोडलेलं शहाळं घरी आणा आणि त्याचं पाणी एका पातेल्यात वेगळं काढून घ्या. आता या पाण्यात कॉर्नफ्लोअर मिसळून मिश्रण ढवळा.
गॅसच्या मध्यम आचेवर एक पातेलं किंवा खोलगट पॅन ठेवून, त्यामध्ये एक ते दोन चमचे तूप घाला. तूप थोडं तापल्यानंतर त्यामध्ये काजू, बदाम घालून, ते गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. आता परतलेले काजू-बदाम छोट्या वाटीत किंवा बाउलमध्ये काढून घ्या.
आता त्याच तूप असलेल्या पॅन किंवा पातेल्यात तयार केलेलं शहाळ्याचं मिश्रण घालून, त्यात थोडी साखर घालून ते ढवळत राहा. मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत ते ढवळत राहा.
आता शहाळ्यात असलेली मलई / खोबरं काढून घेऊन, त्याचे सुरीनं बारीक तुकडे करून घ्या. हे बारीक तुकडे शिजत असलेल्या शहाळ्याच्या मिश्रणात घालून मिश्रण ढवळा.
चार ते पाच वेलचीच्या पाकळ्या घेऊन, त्या एक किंवा दोन चमचे साखरेसोबत मिक्सरमधून वाटून घ्या. त्यामुळे साखरेला वेलचीचा सुंदर स्वाद व सुगंध लागतो. ही बारीक केलेली पावडर शिजत असलेल्या मिश्रणात घालून, त्यासोबत वरून एक चमचा तूप आणि परतलेले काजू, बदाम आपल्या तयार होणाऱ्या शहाळ्याच्या हलव्यात घालून, ते मिश्रण व्यवस्थित ढवळून एकजीव करून घ्या.
आता तयार आहे आपला वेगळ्या चवीचा आणि झटपट तयार होणार शहाळ्याचा हलवा. तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचं प्रमाण कमी-जास्त करू शकता.