रोज सकाळी, जेवायला काय बरं बनवायचं, हा प्रश्न हमखास पडतो. आठवड्यातले सातही दिवस पोळी-भाजी, भात-वरण, असा स्वयंपाक करायचाही कंटाळा येतो. अशा वेळेस जिभेची चव बदलावी म्हणून आपण बाहेर जातो किंवा घरीच हॉटेलमधून काहीतरी मागवतो.
पण काही मंडळी, जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किंवा तंदुरुस्त राहण्यासाठी बाहेरचे पदार्थ खाणं शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करीत असतात, त्यांचं काय? त्यांना कधीतरी काही वेगळ्या चवीचे; पण पौष्टिक पदार्थ खाता यावे म्हणून @finefettlecookerys या इन्स्टाग्राम हँडलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पौष्टिक डोशाची एक रेसिपी शेअर केली आहे. त्यात तांदळाच्या पिठाचा वापर न करता, पालक आणि बाजरी यांचा उपयोग करण्यात आला आहे.
ज्यांना आपला आहार सांभाळून, रोजच्या जेवणापेक्षा काही वेगळं खायचं असेल त्यांना पालकाचे डोसे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या डोशांमध्ये पालक, बाजरी यांसारखे पदार्थ वापरले गेल्यानं लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्ससह हा पदार्थ पौष्टिक बनतो. त्यामुळे तुमचं ‘डाएट’ न बिघडवता, या डोशांचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.
पालक-बाजरीचे डोसे कसे बनवावेत?
हेही वाचा : Video : घरात नको असलेल्या या गोष्टीने सजवा तुमचे घर; पाहा दिवाळी सजावटीसाठी हे सुंदर DIY
साहित्य
१ वाटी बाजरी
१/४ वाटी अख्खे मसूर
एक छोटा चमचा मेथी दाणे
पालक १ जुडी
मीठ
कृती :
सर्वप्रथम बाजरी, मसूर व मेथीचे दाणे पाण्यात व्यवस्थित धुऊन घ्या आणि चार ते पाच तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा.
पालक व्यवस्थित पाण्याखाली धुऊन घेऊन, त्याची देठं वेगळी करा.
आणि पानं मधोमध चिरून घ्या.
नंतर भिजवलेले बाजरी, मसूर, मेथीचे दाणे व पालक एकत्रितपणे मिक्सरच्या भांड्यात टाकून, ते बारीक वाटून घ्या.
या मिश्रणात चवीनुसार मीठ टाकून, गरज वाटल्यास अगदी थोडे पाणी टाकून मिक्सरमधून फिरवा.
आता तुमचे डोशाचे पीठ तयार आहे.
मग एका गॅसवर तवा ठेवून, तो व्यवस्थित तापू द्या.
तापलेल्या तव्यावर नेहमी डोसे घालतो, त्यानुसार एक डाव पीठ ओतून, ते व्यवस्थित पसरून घ्या.
डोशावर थोडं तूप किंवा तेल पसरवून, तो काही मिनिटांसाठी झाकून ठेवा.
डोशावरील झाकण काढून, डोसा नीट सुटला आहे ना याची खात्री करा.
आता तयार आहे तुमचा पौष्टिक पालक बाजरी डोसा. हा डोसा ताटलीत काढून घेऊन, चटणी आणि सांबारसोबत खाण्याचा मस्त आनंद घ्या.