जुहू चौपाटीवर भाजलेला, लिंबू आणि मीठ लावलेला कणीस खाणं म्हणजे वेगळंच सुख! मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबाबरोबर गप्पागोष्टी करत हा भाजलेल्या मका खाण्याची वेगळीच मजा असते. मक्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात ; ज्यात स्वीट कॉर्न सूप, भजी, उपमा, स्वीट कॉर्न बॉल, चटपते कॉर्न, आदी अनेक पदार्थ तुम्ही आतापर्यंत नक्कीच खाल्ले असतील. तर आज आपण एका नवीन पदार्थ बनवणार आहोत. याचे नाव आहे ‘मक्याचे कटलेट’. चला तर पाहू कसं बनवायचा हा पदार्थ.
साहित्य –
१. बटाटे
२. कांदा
३. टोमॅटो
४. भोपळी मिरची
५. उकडलेले मक्याचे दाणे
६. दोन लसणाच्या पाकळ्या
७. दोन हिरव्या मिरच्या
८. आलं
९. दोन चमचे तांदळाचे पीठ
१०. दोन चमचे कॉर्न फ्लोअर
११. लाल तिखट
१२. चाट मसाला
१३. हळद
१४. धने-जिरे पूड
१५. लिंबाचा रस
१६. कोथिंबीर
१७. मीठ
हेही वाचा…VIDEO: विकेंड होईल खास! पनीरपासून बनवा ‘हा’ पदार्थ; झटपट होणारी सोपी रेसिपी लगेच लिहून घ्या
कृती –
१. कूकरमध्ये बटाटे उकडवून घ्या. थोडे गार झाले की किसणीवर किसून घ्या.
२. त्यात तांदळाचे पीठ, कॉर्न फ्लोअर, लाल तिखट, धने जिरे पावडर, हळद, मीठ घाला.
३. त्यानंतर याचे लहान-लहान गोळे तयार करा.
४. दुसरीकडे मक्याचे दाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
५. कांदा, भोपळी मिरची, टोमॅटो, गाजर बारीक चिरून घ्या. आलं, लसूण, मिरचीची एक पेस्ट तयार करून घ्या आणि कोथिंबीर चिरून घ्या.
६. एका बाउलमध्ये हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. वरून लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घाला.
७. हे मिश्रण बटाटाच्या गोळ्यांमध्ये भरून घ्या.
८. तुम्ही यांना तुमच्या आवडत्या आकारामध्ये सुद्धा बनवू शकता.
९. नंतर तव्यावर तेल टाकून कटलेट दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.
१०. अशाप्रकारे तुमचे मक्याचे कटलेट तयार.
मका खाण्याचे आरोग्यदायी फायदे –
मका हा पिष्टमय पदार्थाचा स्रोत तर आहेच, पण इतरही अनेक पोषकतत्त्वे मक्यातून मिळतात.मक्याच्या एका कणसात ६ ते ८ ग्रॅम नैसर्गिक साखर असते. मक्यात ‘ब’ आणि ‘क’ जीवनसतत्त्व तर आहेच, पण मॅग्नेशियम आणि पोटॅशियमदेखील मक्यातून मिळते. पिवळ्या रंगाच्या मक्यात ‘अॅन्टिऑक्सिडंट’चे प्रमाणही उत्तम असते. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ही अॅन्टिऑक्सिडंट फायदेशीर ठरतात. याशिवाय मक्याच्या दाण्यांमध्ये न विरघळणाऱ्या तंतुमय पदार्थाचे प्रमाणही चांगले आहे.
© IE Online Media Services (P) Ltd