दिवाळीची सुरुवात झाली असून, लाडू, करंजी, पेढे, बर्फी सगळ्या पदार्थांची पाच दिवस अगदी रेलचेल असणार आहे. अशात साखर वाढण्याची सगळ्यांनाच चिंता असते. खासकरून ज्यांना साखरेचा त्रास आहे, त्यांना तर दिवाळीमध्ये किंवा कोणत्याही सण-समारंभात आपल्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. पण, अशा सणासुदीच्या काळात साखर वाढण्याची चिंता न करता, तुम्ही ही घरगुती शुगर फ्री बर्फी बनवून, आपल्या आरोग्याची काळजी घेऊन सण साजरा करू शकता. सोशल मीडियावर @finefettelcookerys या इन्स्टाग्राम हँडलने अशाच एका साखर न वापरता बनवलेल्या बर्फीची रेसिपी शेअर केली आहे. चला तर, मग पटकन ही घरगुती शुगर फ्री बर्फी कशी बनवायची ते आपण पाहू.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य :

बदाम
काजू
अक्रोड
सूर्यफुलाच्या बिया
भोपळ्याच्या बिया
जवस
पांढरे तीळ
काळे तीळ
८ ते १० ओले खजूर
दूध

कृती :

सर्वप्रथम खजुरातून त्याच्या बिया बाजूला काढून घेऊन, ते सर्व खजूर कोमट दुधामध्ये ३० मिनिटांसाठी भिजत ठेवा.

आता एका तव्यावर बदाम, काजू, अक्रोड हा सर्व सुका मेवा आणि सूर्यफुलाच्या व भोपळ्याच्या बिया १० ते १२ मिनिटांसाठी व्यवस्थित भाजून घ्या. आता भाजलेले हे सर्व घटक मिक्सरच्या भांड्यात टाकून, त्याची मस्त बारीक पावडर करून घ्या. नंतर भिजवून ठेवलेले खजूर मिक्सरमध्ये घालून ते मिश्रण वाटून घ्या.

हेही वाचा : पिझ्झावर आधी चॉकलेट, अननस घातले; पण आता मात्र कहर झाला! पिझ्झाप्रेमींनो, व्हायरल होणारा हा स्नेक पिझ्झा बघा!

आता एका खोलगट तव्यात किंवा पातेल्यामध्ये थोडे तूप घालून, त्यामध्ये तयार केलेले खजुराचे मिश्रण घाला आणि ते चार ते पाच मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घ्या. खजुरातील पाणी पूर्णपणे निघून जाईपर्यंत हे मिश्रण शिजवा. आता त्यामध्ये सुका मेवा आणि सूर्यफूल व भोपळ्याच्या बियांची बारीक पावडर टाका. हे मिश्रणही काही वेळासाठी शिजवून घ्या. त्यानंतर शेवटी भाजलेले काळे व पांढरे असे दोन्ही तीळ घालून या मिश्रणाला व्यवस्थित एकजीव करून घ्या.

हे मिश्रण आकार देण्याइतपत घट्ट राहील, असे ठेवा.

आता एका ताटलीत थोडे तूप लावून किंवा बटर पेपर ठेवून, तयार झालेले हे बर्फीचे मिश्रण काढून घेऊन थंड होण्यास ठेवा. हे मिश्रण गार झाल्यानंर त्याला हव्या त्या आकारात कापून घ्या आणि सजावटीसाठी चांदीचा वर्ख लावा.

आता बघा तयार आहे तुमची भन्नाट खजुरापासून बनवलेली घरगुती शुगर फ्री बर्फी. सोशल मीडियावरील @finefettelcookerys या इन्स्टाग्राम हँडलने अजून काही मस्त आणि पौष्टिक पदार्थांच्या रेसिपींचे व्हिडीओ आपल्या अकाउंटवरून शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make homemade sugar free barfi for diwa li festival with this recipe use nuts seeds and dates dha