केक, बेकरी यांसारखे पदार्थ म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर लगेच डार्क चॉकलेटी रंगाचे केक, पेस्ट्री, चीज केक, कप केक येतात. पण त्यातले काही पदार्थ ठरावीक दिवशी, ठरावीक वेळी खाण्यातच मजा असते. म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी केक खाणे किंवा एखाद्या कॅफेमध्ये गेल्यानंतर सर्व जेवण झाल्यावर गोड पदार्थ म्हणून तोंडात विरघळणारा चीज केक, असे निवडक पदार्थ निवडक वेळी खाण्यात खरी मजा येते; परंतु मफिन्सचे तसे नाही. तुमची कधीही इच्छा झाली किंवा चहा-कॉफीसोबत बिस्किटांव्यतिरिक्त काही खावंसं वाटत असेल, तर मफिन्स हा एकदम मस्त पर्याय आहे.
परंतु, नाही म्हटलं तरी मफिन्स हा एक गोड पदार्थ आहे. त्यामध्ये असणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण, साखर यांमुळे इच्छा असूनही अनेक जण मफिन्स खात नाहीत. मात्र, गाजर आणि अक्रोडचा वापर करून, बनवलेले हे भरपूर पौष्टिकता असलेले मफिन्स तुम्ही अगदी बिनधास्तपणे खाऊ शकता. याबाबतची रेसिपी बघण्याआधी गाजर-अक्रोडाचे मफिन्स खरेच पौष्टिक आहेत का तेसुद्धा पाहू.
हेही वाचा : किचन टिप्स : घरातील ‘या’ अन्नपदार्थांचे आयुष्य वाढवा; पाहा ‘हे’ पाच सोपे, उपयुक्त आणि घरगुती उपाय…
गाजर, अक्रोड मफिन्स खरेच पौष्टिक असतात का?
एनडीटीव्हीच्या [NDTV] एका लेखानुसार, मफिन्समध्ये जे पदार्थ वापरले जातात, त्याच्यावर पदार्थाचा पौष्टिकपणा ठरत असतो. परंतु, गाजर व अक्रोडच्या या मफिन्ससाठी मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो. त्यामुळे आपण मैदा खात आहोत, अशी भावना मनात येत नाही. त्यासोबतच यामध्ये दह्याचा वापर केला जातो; जे तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी चांगले असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे साखरेऐवजी मध किंवा मेपल सिरपचा वापर केला जाऊ शकतो. यात वापरल्या जाणाऱ्या अशा काही लहान लहान घटकांमुळे गाजर, अक्रोडचे मफिन्स इतर मफिन्सपेक्षा पौष्टिक ठरतात, अशी माहिती मिळते.
आता या पदार्थाबद्दल एवढी चर्चा झाली आहे, तर लगेच त्याची रेसिपी पाहू.
गाजर आणि अक्रोड मफिन्सची रेसिपी
साहित्य
गाजर
अक्रोड
गव्हाचे पीठ
दालचिनी पावडर
मीठ
बेकिंग सोडा
तेल [ऑलिव्ह किंवा इतर]
मेपल सिरप/मध
अंडी
दही
व्हॅनिला इसेन्स
टूटी फ्रूटी
हेही वाचा : बेकिंगचा नुसता व्हिडीओ बघून तोंडाला सुटेल पाणी; सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ टाइमलॅप्स नक्की पाहा
कृती
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, दालचिनी पावडर, मीठ व बेकिंग सोडा हे कोरडे पदार्थ एकत्र मिसळून घ्यावे.
त्यानंतर कोरड्या मिश्रणात किसलेले गाजर आणि बारीक तुकडे केलेले अक्रोड घालून, पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकत्र ढवळून घ्या.
आता दुसऱ्या बाऊलमध्ये तेल आणि मेपल सिरप किंवा मध एकत्र मिसळून घ्या.
या मिश्रणात अंडी, दही व व्हॅनिला इसेन्स घालवून सर्व ओले मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्या.
आता दोन्ही कोरडे आणि ओले मिश्रण एकत्र करून सर्व पदार्थ एकजीव होईपर्यंत मफिन्सचे मिश्रण ढवळत राहावे.
आता तयार मिश्रण, तेल लावलेल्या मफिन्स ट्रेमध्ये घालून घ्या आणि त्यावर थोडी टूटी फ्रूटी घाला.
आता मफिन्स ट्रे २२० डिग्री प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये ठेवून, मफिन्स बेक करून घ्या..
साधारण १२ ते १५ मिनिटांपर्यंत मफिन्स बेक होऊ द्यावेत.
पदार्थ तयार झाला आहे का हे तपासण्यासाठी, एक टूथपिक घेऊन मफिन्समध्ये घालून पाहावी. जर तुमची टूथपिक जशीच्या तशी बाहेर आली, तर तुमचा पदार्थ तयार आहे, असे समजावे.