लिंबू, कैरी किंवा वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून आपल्या घरात सतत कोणती तरी लोणची बनवली जातात किंवा आणली जातात. उन्हाळ्यात कैरीचे लोणचे हे हमखास बनवले जाते. कारण या काळात, म्हणजे उन्हाळ्यात चांगल्या कैऱ्या, आंबे येत असतात. त्याचप्रमाणे हिवाळ्यातदेखील अनेक प्रकारच्या भाज्या येत असून, त्यांचीदेखील अतिशय सुंदर चवीची लोणची घालता येतात. त्यापैकीच शलगम किंवा सलगम नावाचे एक कंद आहे, ज्याचा वापर करून लोणची बनवली जातात.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून @natashaagandhi या हँडलरने त्यांच्या घरी पन्नास वर्षांपासून बनवल्या जाणाऱ्या शलगम, गाजर आणि फुलकोबीच्या [फ्लॉवर] लोणच्याच्या रेसिपीचा रील व्हिडीओ शेअर केला आहे; तर याची रेसिपी काय आहे ते पाहू.
गाजर, फुलकोबी आणि शलगम लोणच्याची रेसिपी
साहित्य
- गाजर
- फुलकोबी
- शलगम
- मीठ
- मोहरी
- आले
- मोहरीचे तेल
- गूळ
- लाल तिखट
हेही वाचा : तळलेले पदार्थ मऊ पडत आहेत? पाहा, या पाच सोप्या हॅक्स करतील तुमची मदत
कृती
सर्वप्रथम गाजर, फुलकोबी आणि शलगम या सर्व भाज्यांना छोटे छोटे चौकोनी कापून घ्यावे.
गॅसवर एका पातेल्यात पाणी घालून त्यामध्ये थोडे मीठ टाकून सर्व भाज्यांना त्या पाण्यात काही मिनिटांसाठी उकळून घ्यावे.
आता एका खलबत्यामध्ये, मोहरी कुटून घेऊन त्याची बारीक पावडर करावी.
गॅसवर एका पातेल्यात मोहरीचे तेल घालून घेऊन त्यामध्ये आल्याचे बारीक उभे चिरलेले तुकडे आणि गूळ घालून, गूळ विरघळेपर्यंत परतून घ्या.
आता या परतलेल्या पदार्थांमध्ये सर्व भाज्या, कुटलेली मोहरी, मीठ आणि तिखट घालून सर्व पदार्थ पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यावे.
तयार आहे तुमचे, गाजर, फुलकोबी आणि शलगमचे लोणचे.
आता हे लोणचं काचेच्या हवाबंद बरणीमध्ये घट्ट बंद करून ठेवून, अधूनमधून बरणीतील लोणचे वरखाली करत राहा.