Palak Paratha Recipe: पालकाची भाजी कितीही पौष्टिक असली तरी ती सर्वांनाच खायला आवडत नाही. अशावेळी पालकपासून भाजी व्यतिरिक्त इतरही काही सोप्या रेसिपी ट्राय करू शकता. जेणेकरून पालकचे पोषकतत्वदेखील तुम्हाला मिळतील. पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अॅसिड, प्रथिने, खनिजे, आद्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, जीवनसत्त्वे, फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते.
पालक पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
१. ३ जुडी पालक
२. १०-१२ लसणाच्या पाकळ्या
३. २ चमचा किसलेलं आलं
४. १ चमचा धणे पूड
५. १ चमचा जिरे पूड
६. १/४ चमचा हळद
७. १/२ चमचा तिखट
८. २ वाटी गव्हाचे पीठ
९. १ वाटी बेसनाचे पीठ
१०. मीठ चवीनुसार
११. पाणी आवश्यकतेनुसार
१२. तेल आवश्यकतेनुसार
पालक पराठा बनवण्याची कृती :
१. सर्वात आधी पालक साफ करून धुवून बारीक चिरून घ्या.
२. त्यानंतर लसूण-आलं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
३. आता गव्हाचे पीठ आणि बेसनचे पीठ व्यवस्थित एकत्र करून त्यात लाल तिखट, मीठ, हळद, धणे पूज, जिरे पूड, लसूण-आल्याची पेस्ट आणि शेवटी चिरलेला पालक घाला.
४. आता हे सर्व थोडे पाणी घालून व्यवस्थित मळून घ्या.
हेही वाचा: अवघ्या काही मिनिटांत मुलांसाठी बनवा ‘नाचणीचे पौष्टिक बिस्किट’; नोट करा साहित्य आणि कृती
५. त्यानंतर आवश्यकतेनुसार तेल घालून कणकेचा गोळा करून ठेवा आणि याचे पराठे बनवा.
६. तयार गरमागरम पराठे दह्यासोबत किंवा सॉससोबत सर्व्ह करा.