घरी पाहुणे येणार असतील किंवा लहान मुलांसाठी चमचमीत, पण त्यातल्या त्यात पौष्टिक काही बनवायचे असेल तर सतत काहीतरी नवीन काय बनवायचे असा प्रश्न आपल्याला बरेचदा पडलेला असतो. अशावेळेस, ब्रेड रोल्सची निवड अगदी उत्तम ठरेल. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत हे ब्रेड रोल्स सगळ्यांना आवडतील. हा पदार्थ बनवायलादेखील फारच सोपा आणि घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून अगदी सहज बनवता येऊ शकतो.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून @hunger_effect या हँडलने या चविष्ट ब्रेड रोल्सची रेसिपी शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हेज ब्रेड रोल्सची रेसिपी पाहा :

साहित्य

उकडलेले बटाटे
कांदा
गाजर
मटार
मक्याचे दाणे
सिमला मिरची
हिरवी मिरची
मीठ
तिखट
हळद
आमचूर पावडर
धणे पावडर
मॅगी मसाला
ब्रेड

हेही वाचा : चिमुकल्या शेफने दाखवली स्प्रिंग रोलची रेसिपी; रेसिपी घ्या आणि ‘हा’ पदार्थ वापरून पाच मिनिटांत बनवून पाहा….

कृती

एका मोठ्या बाऊलमध्ये उकडलेले बटाटे, उकडलेले मटार आणि मक्याचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली सिमला मिरची आणि किसलेले गाजर घालून घ्या. त्यामध्ये सर्व मसाले म्हणजेच मीठ, तिखट, हळद, आमचूर पावडर, धणे पावडर, मॅगी मसाला आणि बारीक केलेली हिरवी मिरची असे सर्व घालून घेऊन, सर्व मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या. या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करा.

आता ब्रेडचा एक स्लाइस घ्या आणि तो पाण्यात पूर्ण बुडवून, त्यातील राहिलेले पाणी हलक्या हाताने ब्रेडमधून दाबून बाहेर काढा. ह्या पाण्याने भिजवलेल्या ब्रेडमध्ये तयार बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे ठेऊन ब्रेड व्यवस्थित बंद करून घ्या.

एका कढईत मध्यम आचेवर तेल तापवत ठेवा. तेल तापल्यानंतर त्यामध्ये ब्रेडचे तयार केलेले रोल्स तळून घ्या. सर्व रोल्स सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळावे. तयार झालेले ब्रेड रोल्स हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make tasty veg bread roll snacks for kids or at family party note down the recipe dha