वर्षातील सर्व ऋतुंपेक्षा हिवाळा हा अनेकांचा लाडका असतो. कारण यामध्ये उन्हाने अंग भाजून निघत नाही की पावसाच्या पाण्याने झालेल्या चिखलाचा त्रास होत नाही. सोबतच हिवाळ्यात विविध प्रकारचे अन्नपदार्थ, पेय खाता-पिता येत असतात. अशाच थंडीच्या दिवसांमध्ये जेवण झाल्यानंतर मस्त असा एखादा गोडाचा पदार्थ समोर आला म्हणजे दिवसाचा शेवट गोड झालाच म्हणून समजा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परंतु, अनेकदा हे पदार्थ खाताना आपल्याला मजा येत असली तरीही याचा आरोग्यावर फार काही चांगला परिणाम होत नाही. बऱ्याचदा अशा गोड पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात साखर, तेल, फॅट्स यांसारखे घटक असतात, ज्यामुळे या पदार्थांच्या सेवनाने भरपूर प्रमाणात अतिरिक्त कॅलरीज आपल्या शरीरात जात असतात, जे नंतर मोठ्या आजारांना आमंत्रण देतात. परंतु, याचा अर्थ आपण गोड पदार्थ खाऊच नये असा होतो का? अजिबात नाही.

प्रत्येक हवामानामध्ये काही विशिष्ट फळं, भाज्या, धान्य आणि डाळी मिळत असतात. अशा ‘सिझनल’ गोष्टींपासून आरोग्याला चांगले असतील असे गोड पदार्थ घरी बनवून नक्कीच खाल्ले जाऊ शकतात. हिवाळ्यात कमी फॅट्स असणाऱ्या हलव्याच्या या पाच अतिशय सोप्या आणि शेफने सुचवलेल्या रेसिपीज पाहा

हेही वाचा : तेलाचा वापर न करता, घरी बनवा ‘वडे अन् भजी’; आश्चर्य वाटतंय? आहारतज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ रेसिपी करून पाहा….

हलव्याच्या पाच रेसीपी

१. बिटाचा हलवा

साहित्य

४०० ग्रॅम बीट
५० ग्रॅम गूळ
२०० मिली दूध
तूप
पिस्ता

कृती

  • सर्वप्रथम बीट सोलून ते किसून घ्या.
  • एक खोल पातेले गॅसवर ठेवून त्यामध्ये किसलेले बीट शिजवण्यासाठी घालून घ्या.
  • १० ते १५ मिनिटांनी बिटाचा रंग बदलण्यास सुरुवात होईल. आता त्याच्यामध्ये गूळ घालून मिश्रण व्यवस्थित ढवळत राहा.
  • हे सर्व मिश्रण मिडीयम गॅसवर ठेवून सतत ढवळत राहा. हळूहळू बीट आणि गुळाचा रंग बदलून सुगंध येऊ लागेल.
  • त्यानंतर यामध्ये दूध घालून घेऊन मिश्रण ढवळत राहावे.
  • आता दूध पूर्णपणे पदार्थात एकजीव झाल्यानंतर हलवा हळूहळू छान घट्टसर होऊ लागेल.
  • हलवा व्यवस्थित घट्ट झाल्यानंतर, तो एका बाऊलमध्ये काढून घ्यावा.
  • हा बिटाचा हलवा तुम्ही गार किंवा गरम कोणत्याही पद्धतीने खाऊ शकता. खायला घ्यायच्या आधी यावर पिस्ता किंवा पिस्त्याची पावडर घालू शकता.

[ही रेसिपी गॉर्मेस्तानच्या [Gourmestan] संस्थापक आणि शेफ शिवानी शर्मा यांची आहे.]

२. खजुराचा हलवा

साहित्य

१ कप खजूर
तूप
बदाम
काजू
पिस्ता
वेलची पूड
केशर
दूध

कृती

  • सर्वप्रथम खजुरांमधील बिया काढल्या असल्याची खात्री करावी. त्यानंतर सर्व खजूर मिक्सर किंवा फूड प्रोसेसरला लावून घेऊन त्याची छान पेस्ट करून घ्या. खजूर कोरडे वाटत असल्यास वाटण्याच्या आधी १५ ते २० मिनिटांसाठी गरम पाण्यात भिजवून ठेवावे.
  • एका नॉन स्टिक पॅनमध्ये तूप घालून ते मध्यम आचेवर गरम करून, त्यामध्ये खजुराची पेस्ट घालून घ्यावी.
  • खजुराची पेस्ट पॅनला चिकटू नये यासाठी ती घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा.
  • त्यानंतर यामध्ये तुकडे केलेले बदाम, काजू, पिस्ता, वेलची पूड आणि केशराच्या काही काड्या घालून हलवा घट्ट होईपर्यंत ढवळत राहा.
  • तुम्हाला हा हलवा खूप घट्ट नको असल्यास त्यामध्ये थोडे दूध घालून शिजवून घ्या.
  • तयार झालेला पौष्टिक हलवा गरम असताना खाऊ शकता.

[ही रेसिपी एसजेआय हॉस्पिटॅलिटी अँड फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह शेफ, शेफ इशिज्योत सुरी यांची आहे.]

हेही वाचा : Kitchen Tips : यापुढे डोसे, घावण तव्याला अजिबात चिकटणार नाही; ‘हा’ पदार्थ घेईल त्याची काळजी, पाहा ही सोपी ट्रिक

३. केळ्याचा हलवा

साहित्य

५ लहान केळी
दूध
नाचणीचे पीठ
साखर
तूप
वेलची पावडर
काजू
बदाम

कृती

  • मिक्सरच्या एका भांड्यात दूध आणि सालं सोललेली केळी घालून घेऊन, त्यांचे मिश्रण तयार करावे.
  • एका पॅनमध्ये तूप घालून घ्या. तूप थोडे तापल्यानंतर त्यामध्ये बदाम, काजू आणि पिस्त्याचे बारीक केलेले तुकडे घालून ते सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घेऊन नंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या.
  • आता त्याच पॅनमध्ये दूध आणि केळ्याची केलेली पेस्ट घालून घेऊन ती व्यवस्थित ढवळून घेत राहा.
  • आता एक एक करत साखर आणि वेलची पावडर घालून घेऊन मिश्रण सतत ढवळत राहावे.
  • सर्वात शेवटी यामध्ये परतलेले काजू, बदाम आणि पिस्ता घालून घ्यावे.
  • केळ्याचा हलवा घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावा.

[रेसिपी- शेफ शिवानी शर्मा]

४. रताळ्याचा हलवा

साहित्य

दोन मोठी रताळी
मीठ
तूप
काजू
पिस्ता
गूळ
केशर
वेलची पावडर

कृती

  • सर्वप्रथम कुकरमध्ये थोडे मीठ घालून रताळी उकडवून घ्यावी. रताळी गार झाल्यानंतर त्यांना सोलून, व्यवस्थित कुस्करून घ्यावे.
  • एका पॅनमध्ये बदाम आणि पिस्ते तुपावर सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावे आणि नंतर बाजूला ठेवून द्यावे.
  • पुन्हा त्याच पॅनमध्ये राहिलेल्या तुपात, कुस्करलेली रताळी घालून घेऊन त्यामध्ये थोडी वेलची पावडर घालून पाच मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावे.
  • तुम्हाला हवे असल्यास गूळ घालून हे मिश्रण शिजवून घ्या.
  • हलवा घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून एका बाऊलमध्ये काढून घेऊन, परतलेला सुकामेवा घाला.
  • रताळ्याचा हलवा गार किंवा गरम दोन्ही पद्धतीने खाल्ला जाऊ शकतो.

[रेसिपी- शेफ शिवानी शर्मा]

५. बाजरीचा हलवा

साहित्य

बाजरीचे पीठ
गूळ
तूप
दूध
वेलची पूड
सुकामेवा [बदाम, काजू, पिस्ता]

साहित्य

  • एका पातेल्यात तुपावर बाजरीचे पीठ रंग बदलेपर्यंत परतूून घ्या. मात्र, पीठ जळणार नाही याची काळजी घ्या.
  • दुसऱ्या पातेल्यामध्ये दुधामध्ये गूळ घालून, त्याचा पाक होईपर्यंत मिश्रण शिजवून घ्या.
  • आता हळूहळू गुळाचा पाक भाजलेल्या बाजरीच्या पिठामध्ये घालून घ्या. ही कृती करत असताना दुसऱ्या हाताने पीठ सतत ढवळत राहावे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
  • यानंतर वेलची पूड आणि सुकामेवा घालून सर्व पदार्थ व्यवस्थित शिजवून घ्यावे.
  • हलवा घट्ट झाल्यानंतर त्याखालील गॅस बंद करून एका बाऊलमध्ये काढून घ्यावा.
  • हिवाळ्यामध्ये गरमागरम बाजरीचा हलवा खाण्यासाठी फार सुंदर लागतो.

[ही रेसिपी, शेफ इशिज्योत सुरी यांची आहे.]

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make these five delicious and healthy low fat low sugar halwa recipe for this chilly winter season dha
Show comments