रोजच्या जेवणात पौष्टिक पदार्थ, पोळी-भाजी, डाळ-भात खाऊन कंटाळा येतो. दिवाळीतला फराळ आणि गोड पदार्थ खाऊनदेखील तोंडाला गुळचट चव आलेली असते. त्यामुळे जिभेची, तोंडाची चव बदलण्यासाठी कधीतरी चटपटीत व अरबटचरबट पदार्थ खावेसे वाटले, तर त्यात काही चूक नाही. अशा वेळेस घरगुती पौष्टिक पदार्थ सोडून जेव्हा काही चमचमीत खाण्याची इच्छा होते, तेव्हा आपली पावलं आपसूकच चाट आणि ‘स्ट्रीट फूड’कडे वळतात. वडापाव, पाणीपुरी, भेळ, शेवपुरी व रगडा पॅटिस याव्यतिरिक्त काही वेगळं खायचं असेल, तर हा एक पदार्थ खाण्यासाठी सगळेच पटकन तयार होतात आणि तो पदार्थ म्हणजे फ्रँकी. फ्रँकी जितक्या आरामात बाहेर मिळते, तितक्याच सहजतेने घरीदेखील बनवता येत असून, तितकीच ती पोटभरीचीही आहे. या फ्रँकीला अजून चविष्ट, चमचमीत व कुरकुरीत बनवण्यासाठी मुंबई स्ट्रीट स्टाईल लेज फ्रँकीची रेसिपी पाहा.
मुंबई स्ट्रीट स्टाईल लेज फ्रँकी म्हणजे नेमके काय?
मुंबईच्या जवळपास सर्व गल्ल्यांमध्ये, रस्त्यावर तुम्हाला फ्रँकी मिळते. काही लोकांचा ‘फ्रँकी’ आणि ‘काठी रोल’मध्ये गोंधळ होत असला तरीही हे दोन्ही वेगळे पदार्थ आहेत. फ्रँकीसाठी वापरली जाणारी पोळी ही थोडी जास्त पातळ असून, त्यामध्ये तुम्हाला आवडतील ते पदार्थ तुम्ही घालू शकता. फ्रँकीमध्ये बरेचदा, बटाट्याची टिक्की, कांदा, टोमॅटो व चीज असे पदार्थ टाकले जातात. तुम्हालासुद्धा जर संध्याकाळी काही चटपटीत खावेसे वाटत असेल, तर ही सोपी रेसिपी एकदा बनवून बघा.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @spoonsofdilli या हँडलने मुंबई स्ट्रीट स्टाईल लेज फ्रँकीची रेसिपी शेअर केली असून, ती घरी कशी बनवायची ते पाहा.
हेही वाचा : DIY: संत्र्यापासून बनवा सुगंधी दिवा, मन आणि घर दोन्हीही राहतील प्रसन्न; कसा बनवायचा पाहा….
साहित्य :
तेल
कांदा
उकडलेले तीन-चार बटाटे
लसूण
जिरे
धणे पावडर
लाल तिखट
गरम मसाला
मिरपूड
टोमॅटो सॉस
चिली सॉस
मीठ
कोथिंबीर
व्हिनेगर
हिरव्या मिरच्या
अनार किंवा आमचूर पावडर
कृती :
१. बटाट्याचे पॅटिस
एका खोलगट पॅन/तव्यामध्ये थोडे तेल घालून घ्या. तेल तापल्यानंतर त्यामध्ये लसूण पेस्ट आणि सर्व मसाले घालून परतून घ्या. मसाल्याचा रंग बदलल्यानंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे आणि चवीनुसार मीठ घालून, सर्व मिश्रण व्यवस्थित शिजवा. नंतर हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून पॅटिस/टिक्कीचे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्या. मिश्रण गार झाल्यानंतर त्याला लांबट आकार द्या.
२. चिली व्हिनेगर
फ्रँकीसाठी लागणारे चिली व्हिनेगर बनवण्यासाठी एक किंवा दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून, त्यामध्ये २० मिली. व्हिनेगर घालून दोन्ही व्यवस्थित ढवळून घ्या.
३. फ्रॅंकीचा मसाला
फ्रँकीसाठी मसाला बनवण्यासाठी सर्व कोरडे मसाले म्हणजेच काश्मिरी लाल तिखट, धणे पावडर, जिरे पावडर, डाळिंब किंवा आमचूर पावडर, गरम मसाला व चवीसाठी मीठ, असे सर्व एका वाटीत व्यवस्थित मिसळून घ्या .
आता फ्रँकी बनवू
तव्यावर थोडे तेल टाकून, त्यावर बटाट्याची लांबट आकाराची टिक्की खरपूस परतून घ्या. आता घरात असणाऱ्या पोळी/चपातीला किंवा पराठा तव्यावर बटर लावून हलके भाजून घ्या. आता या भाजलेल्या पोळीवर खरपूस टिक्की ठेवून, त्यावर बारीक चिरलेला कांदा, फ्रँकी मसाला व चिली व्हिनेगर टाकून घ्या. शेवटी त्यावर लेज वेफर्सचा चुरा आणि चीज घालून पोळी घट्ट बंद करून घ्या.
बघा तयार आहे तुमची मुंबई स्ट्रीट स्टाईल लेज फ्रँकी. ही फ्रँकी तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता.