लवकरच २०२३ हे वर्ष संपून २०२४ या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. नवीन वर्षासोबतच सर्वांना आता ख्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्टीचे वेध लागण्यास सुरुवात झालेली आहे. कॉलेजच्या मुलांपासून ते ऑफिसपर्यंत सगळ्यांचे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्ट्यांचे प्लॅनिंग्स सुरू झाले आहेत. काही जण सुट्ट्या काढून मित्र-परिवारासोबत बाहेर जाणार असतील; तर काही एकमेकांच्या घरी किंवा जवळच कुठेतरी भेटण्याचा प्लॅन करत असतील. अशात तुम्ही जर तुमच्या जवळच्या मित्रांसोबत, कलिग्स किंवा घरच्यांसोबत घरातच पार्टी करणार असाल तर यासाठी तुम्ही एक ‘चिजी’ पदार्थ अगदी सहज बनवू शकता.
पार्टी म्हटलं की वेगवेगळे खाद्यपदार्थ हे आलेच. तुम्ही जर कुणाच्या घरी जाणार असाल किंवा कुणी तुमच्या घरी येणार असतील तर बटाटा आणि चीज वापरून हा चिजी पदार्थ अगदी काहीच मिनिटांमध्ये बनवू शकता. सोशल मीडियावरील @big.eats.world या अकाउंटने आपल्या इन्स्टाग्रामवरून ‘गार्लिक पार्म पोटॅटो बॉल्स’ नावाच्या, अतिशय सोप्या अशा रेसिपीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. नाव ऐकून जरी हा पदार्थ बनवण्यासाठी अवघड वाटत असला, तरी ही रेसिपी मात्र अगदी मोजक्या साहित्याचा वापर करून काही मिनिटांत बनवली जाऊ शकते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या ‘गार्लिक पार्म पोटॅटो बॉल्स’ची रेसिपी काय आहे ते पाहूया.
हेही वाचा : डाळ बनवताना कधीही विसरू नका ‘या’ चार स्टेप्स; पहिल्यांदाच स्वयंपाक करीत असाल, तर लक्षात घ्या या टिप्स
‘गार्लिक पार्म पोटॅटो बॉल्स’ कसे बनवायचे ते पाहा
साहित्य
४ मोठ्या आकाराचे बटाटे
१/२ tbsp कांद्याची पावडर [ओनियन पावडर]
१/२ tbsp लसूण पावडर
४ tbsp कॉर्नस्टार्च
मीठ
मिरपूड
चीज
लसूण
कोथिंबीर
बटर
कृती
- सर्वप्रथम सगळे बटाटे सोलून घेऊन ते चिरून, नंतर त्यांना उकडून घ्या.
- उकडलेले बटाटे किसणीच्या साहाय्याने किसून किंवा हाताने व्यवस्थित कुस्करून घ्यावे.
- एका बाउलमध्ये कुस्करलेले बटाटे, कांद्याची पावडर [ओनियन पावडर], लसूण पावडर, मीठ, मिरपूड आणि कॉर्नस्टार्च घालून सर्व पदार्थांचे मिश्रण एकत्र करा.
- तयार मिश्रण कणकेसारखे दिसेल. आता या एकजीव केलेल्या मिश्रणाचे गोळे तयार करावे.
- तयार केलेल्या गोळ्यांमध्ये मॉझरेला चीजचे तुकडे घालून घ्यावे.
- एका कढईमध्ये तेल तापवून घ्या.
- आता एक एक करत तयार गोळे कढईमधील तेलामध्ये सोडून, ते गोळे सोनेरी होईपर्यंत छान तळून घ्यावे.
- तळलेल्या गोळ्यांना बाहेर काढून एका बाऊलमध्ये काढून घ्यावे.
- या पोटॅटो बॉल्सवर बारीक चिरलेले किंवा किसलेले लसूण आणि पातळ केलेले बटर घालून घ्यावे. सर्व गोळे चमच्याने एकदा ढवळून घ्यावे.
- तयार गार्लिक पोटॅटो चिजी बॉल्सवर बारीक कोथिंबीर आणि किसलेले चीज [पार्मेजान] घालून सजावट करावी.
@big.eats.world ने शेअर केलेल्या या व्हिडीओला २१.४ मिलियन व्ह्यूज मिळाले असून, १.३ मिलियन लाईकदेखील मिळाले आहेत. अशा या अतिशय सोप्या, पण स्वादिष्ट गार्लिक पार्म पोटॅटो बॉल्स यंदाच्या नवीन वर्षाच्या पार्टीसाठी नक्की बनवून पाहा.