दिवाळी असो व दुसरा कुठलाही सण, कुणाकडेही जाताना भेट म्हणून आपण काही ठराविक मिठाया घेऊन जात असतो. पण, सतत एकाच पद्धतीच्या गोडाचे पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही खास नवीन रेसिपी तुमच्यासाठी. दिवाळीसाठी झटपट तयार होणारी आणि सगळ्यांना पसंत पडेल अशी चॉकलेट पिस्ता बर्फी कशी बनवायची पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चॉकलेट पिस्ता बर्फी कशी बनवायची?

साहित्य

१/२ वाटी पिस्त्याची पावडर

दीड वाटी कोको पावडर

दीड वाटी खवा

१/४ वाटी पिठीसाखर

१/४ वेलची पावडर

रोझ इसेन्स [rose essence]

२ वाटी तूप

हिरवा खायचा रंग

सजावटीसाठी चांदीचा वर्ख

कृती :

१. खवा आणि पिठीसाखर

एक खोलगट नॉनस्टिकचं पातेलं गॅसच्या मंद आचेवर ठेवा. त्यामध्ये खवा आणि पिठीसाखर घाला. १५ मिनिटांसाठी खवा आणि पिठीसाखरेचं हे मिश्रण सतत ढवळत राहा.

२. खव्याचे मिश्रण वेगळे करणे

तयार झालेले खव्याचे मिश्रण एका ताटलीत काढून ते थंड होण्यासाठी ठेवा. मिश्रण थंड झाल्यांनतर त्याचे दोन समान भाग करा.

३. कोको पावडर व्यतिरिक्त सर्व पदार्थ मिसळून घेणे

खव्याचा वेगळा केलेला एक भाग खोलगट पातेल्यात घेऊन त्यामध्ये पिस्त्याची पूड, वेलची पूड, रोझ इसेन्सचे काही थेंब आणि खायचा हिरवा रंग घालून सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळून घ्या.

४. कोको पावडर

उरलेल्या खव्याचे मिश्रण एका खोलगट पातेल्यात घेऊन त्यामध्ये कोको पावडर घालून घ्या. हे मिश्रणदेखील व्यवस्थित मिसळून घ्या. नंतर एका सपाट बोर्डवर एक प्लास्टिक शीट पसरून त्यावर थोडं तूप लावून घ्या.

५. या मिश्रणाचे रोल करून घ्या

पिस्त्याचे तयार मिश्रण तूप लावलेल्या बोर्डवर पसरून घ्या. हे मिश्रण हातांचा वापर करून आयताकृती आकारात एकसमान पसरून घ्या. बाजूला कोको पावडरपासून बनवलेले चॉकलेट खव्याच्या मिश्रणाचे थोडे लांब आकाराचे [लंबगोल] गोळे करून घ्या. आता चॉकलेटच्या मिश्रणाचे हे गोळे, पिस्त्याच्या एकसमान पसरलेल्या मिश्रणावर ठेवा. आता या सर्व गोष्टी प्लास्टिक शीटच्या साहाय्याने हळूहळू रोल करून घ्या. हा रोल व्यवस्थित घट्ट असेल याची काळजी घ्या.

६. फ्रीजमध्ये ठेवणे

चॉकलेट पिस्त्याच्या मिश्रणाचे तयार झालेले रोल्स सुरीने कापून घ्या आणि हलक्या हाताने दाबून थोडे चपटे करून १५ मिनिटांसाठी फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा. तयार झालेल्या बर्फीवर चांदीचा वर्ख लावा.

तयार आहे तुमची चॉकलेट पिस्ता बर्फी.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make this quick delicious chocolate pista barfi for diwali at home dha
Show comments