घरी जर एखाद्या वाढदिवसाची किंवा अजून कुठल्या गोष्टीसाठी घरगुती पार्टी ठेवली असेल किंवा मित्रांना घरी बोलावलं असेल, तर त्यांच्यासाठी आपण काही छोटे-मोठे खास पदार्थ नक्कीच बनवतो. छोटा कार्यक्रम असेल, तर त्यासाठी वेगळा मेन्यूदेखील ठरवतो. अशात स्टार्टर्स हा प्रकार सगळ्यांच्या आवडीचा असतो. पण तुम्ही कधी स्टार्टर्स म्हणून बिस्कीट खाण्याचा विचार केला आहे का?
साधारण सध्याचे जे ‘नाईन्टीज किड्स’ आहेत, त्यांनी हा पदार्थ नक्कीच खाल्ला असेल. मोनॅकोची बिस्किटं ही त्यावर चीज आणि टोमॅटो सॉस टाकून खाल्ल्यास खूप चविष्ट लागतात. पण, आता जर या बिस्किटांचे स्टार्टर कोणासाठी बनवायचे असतील, तर त्यावर थोडी सजावट करायला हवीच ना? इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून @plumsandpickle या हँडलने मोनॅको कॅनेपीज नावाचा असाच एक अफलातून पदार्थ रील व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे. अशा झटपट बनणाऱ्या बिस्किटांपासून तयार होणाऱ्या स्टार्टरची रेसिपी काय आहे ते पाहू.
हेही वाचा : पिझ्झाचे आगळेवेगळे Fusion पाहिलेत का? रेसिपी अन् प्रमाण पाहून घरी बनवा हा ‘पिझ्झा पराठा’….
मोनॅको कॅनेपीजची रेसिपी
साहित्य
मोनॅको बिस्कीट
चीज स्लाइस
टोमॅटो सॉस
किसलेले चीज
कांदा
टोमॅटो
काकडी
कृती
एका ताटलीमध्ये मोनॅकोची बिस्किटे काढून घ्या. त्यावर चीज स्लाइसचे छोटे छोटे चौकोनी तुकडे ठेवून, त्यावर दुसरे मोनॅको बिस्कीट ठेवा. आता त्यावर कांदा, टोमॅटो व काकडीच्या थोड्या बारीक चिरलेल्या चकत्या ठेवा. भाज्या ठेवून झाल्यानंतर त्यांच्यावर टोमॅटो सॉस घालून किसलेले चीज भुरभुरावा.
बघा तयार झालेत आपले मोनॅको कॅनेपीज.
तुम्हाला जर यामध्ये ठेवलेल्या भाज्यांवर चाट मसाला घालायचा असल्यास तोसुद्धा तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता. फक्त वरून घातलेल्या मसाल्यांनी हा पदार्थ खारट होणार नाही याची काळजी घ्या.