तंदूर हा प्रकार सर्वांच्याच आवडीचा आहे. आपण कधीही बाहेर जेवायला गेलो, तर सुरुवात तंदुरी पदार्थाने करायची हे ठरलेलं असतं. त्याला कारणही तसंच आहे. तुम्ही व्हेज खाणारे आहात की नॉनव्हेज खाणारे याने काही फरक पडत नाही. कारण- तंदुरी पदार्थांची यादी संपता संपत नाही. मग त्यात पनीर टिक्का, मशरूम टिक्का, तंदुरी चिकन, तंदुरी चाप… तुम्ही जे म्हणाला ते तुम्हाला मिळतं. पण, या तंदुरी पदार्थांच्या अफलातून चवीचं गुपित दडलंय ते त्याच्या विशेष तंदुरी मसाल्यामध्ये. बाजारामध्ये बरेच तंदुरी मसाले उपलब्ध असले तरीही काहींना घरी बनवलेल्या मसाल्याची चव जास्त पसंत पडते. म्हणूनच ही तंदुरी मसाल्याची रेसिपी खास तुमच्यासाठी.
घरी तयार केलेल्या मसाल्यांची चव बाजारातून आणलेल्या मसाल्यांपेक्षा वेगळी जाणवते. तुम्ही जर घरी कुटून ताजा मसाला बनवत असाल, तर तुम्हाला घरगुती ताजा मसाला वापरून केलेला पदार्थ किती वेगळा लागतो हे माहीतच असेल. आता हा तंदुरी मसाला घरी बनवायला खूप सोपा आहे. या पदार्थांना अप्रतिम चव देणारा तंदुरी मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहा आणि लगेच तो घरी तयार करा.
तंदुरी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
आले पावडर १\४ वाटी
लसूण पावडर १\४ वाटी
चाट मसाला दोन चमचे
लाल रंगाची पावडर एक छोटा चमचा
गरम मसाला १\४ वाटी
काळी मिरी दोन चमचे
कांद्याची पावडर १\४ वाटी
कसुरी मेथी १\४ वाटी
तिखट १\४ वाटी
मीठ ३\४ वाटी
धणे पावडर एक छोटा चमचा
हेही वाचा : चहा बनवताना ‘हा’ खास पदार्थ घालून चहाची चव वाढवा; काय आहे रेसिपी पहा…
तंदुरी मसाला बनवायची कृती
१. आले, लसूण व कांद्याची पावडर बनवण्यासाठी या पदार्थांना कडक उन्हात वाळवावे. नंतर मिक्सरमध्ये घालून त्याची पूड करून घ्यावी आणि एका डब्यात ठेवावी.
२. इतर साहित्यदेखील एक दिवसासाठी उन्हात ठेवावे.
३. आता सर्व कोरडे पदार्थ एकत्र करून घ्या.
४. एकत्र केलेल्या पदार्थांना मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून त्याची पावडर करा. ही पावडर एका चाळणीतून चाळून घ्या. तयार झालेली पावडर हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
तंदुरी मसाला बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा.
१. सर्व मसाल्यांना उन्हात वाळवून, त्यातील अतिरिक्त ओलावा काढून टाकणे अवघड असते; पण या प्रक्रियेमुळे मसाला दीर्घकाळ टिकतो.
२. मसाला चाळून घेतल्याने, त्यात जर काही अर्धवट तुकडे राहिले असतील, तर ते सहज बाजूला काढता येतात.
३. तयार मसाला काचेच्या हवाबंद डब्यात ठेवावा.
४. तुम्हाला जर सगळे मसाले उन्हात वाळवणे शक्य नसल्यास, ते मिक्सरमध्ये पूड करण्याआधी तव्यावर व्यवस्थित भाजून घ्या.
तंदुरी मसाला हा केवळ टिक्का बनवण्यसाठी मर्यादित नाहीये. या मसाल्याचा वापर तुम्ही कोणत्याही भाजीत, चिकन बनवताना किंवा बिर्याणी बनवतानाही करू शकता.